
नाटके जरी बंद झाली तरी काही भूमिका या रसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करतात. ती भूमिका त्या रंगकर्मीची ओळख बनते, त्यात अभिनेत्रींनीही आघाडी मारलीय. विजय मेहता यांची ‘हमिदाबाईची कोठी’ यातली हमिदा. रिमा लागू यांची ‘पुरुष’ नाटकातील आंबिका. भक्ती बर्वे हिची ‘ती फुलराणी’तली मंजूळा. चारुशिला साबळे हिची ‘कमला’तील कमला. अशा अनेक भूमिका ज्या अभिनेत्रींना आव्हानात्मक होत्या, त्यावर परिश्रम घेऊन साकार झाल्यात.
अगदी मुस्लिम मोहल्ल्यातील कोठेवरली भाषा असो वा रस्त्यावर फुलं विकणारी अशिक्षित फुलवाली, किंवा बाजारातून विकत आणलेली कमला… एक ना दोन. त्या भूमिकेच्या अस्सलतेसाठी प्रसंगी अभिनेत्रींनी जीवाचे अक्षरशः रान केलं आणि रंगभूमीवर थक्क करून सोडले. या वाटेवर एक नाटक जे तिन्ही माध्यमातून गाजले ते म्हणजे ‘अनन्या!’
पहिलं माध्यम एकांकिका स्पर्धेचे. त्यात स्पृहा जोशीनंतर व्यावसायिक नाटकात ऋतुजा बागवे आणि आता चित्रपटात ऋता दुर्गुळे. ‘अनन्या’ या भूमिकेवर या तिघींनी मोहर उमटवली.
योगायोग म्हणजे तिन्ही माध्यमातली ‘अनन्या’ बघण्याची संधी मिळाली. माध्यम बदलातील बारकावेही त्या निमित्ताने जवळून टिपता आले. जे एका रंगप्रवासातले वैशिष्ट्यपूर्ण ठरलेय. एका नाट्याची ही वाटचाल एखाद्या कादंबरीप्रमाणे रंगतदार आहे.
वर्षे २००८ होते. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे त्यावेळी कमालीचे कुतूहल असायचे.
बरेचदा अनेक निर्माते हे अशा स्पर्धांना हजेरी लावायचे किंवा ‘नवं वेगळं काय?’ याची विचारणा करायचे. ‘ऑल द बेस्ट’ यातूनच पुढे आली. तर ‘अनन्या’ ही एकांकिका रुईया कॉलेजने त्यावर्षी सादर केली. प्रयोगाच्यावेळी एकेका कॉलेज ग्रुपने आपल्या एकांकिकेला दाद दिली. परीक्षकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव आणण्याचाही त्यामागे ‘प्रयोग’ असावा पण ‘अनन्या’ने मात्र साऱ्यांनाच भारावून सोडले.
त्यातील कथानक आणि सादरीकरणामुळे चक्रावून जाणं भाग होतं. एकांकिका स्पर्धेतला हक्काचा हमखास विजेता दिग्दर्शक-नाटककार म्हणून प्रताप फड याची ओळख कॉलेज वर्तुळात होतीच. आणि या एकांकिकेने स्पर्धेत बाजी मारली. विजेतेपद सिद्ध केलं. ‘रुईया’ कॉलेजच्या आवारात ‘अनन्या’ उर्फ स्पृहा जोशी हिला भेटण्यासाठी तरुणाई जमू लागली. एकांकिकेचा परिणामच येवढा जबरदस्त होता की ‘अनन्या’कडे व्यावसायिक निर्मात्यांचे लक्ष जाणं स्वाभाविकच… आणि तेच घडले.
ज्येष्ठ निर्माते सुधीर भट यांच्या ‘सुयोग’ नाट्यसंस्थेची ८५ वी नाट्यकृती म्हणून ‘अनन्या’ निवडली गेली. ‘आर्या’ आणि ऐश्वर्या प्रॉडक्शनचे सहाय्य या निर्मितीला लाभले आणि एकांकिकेच पूर्ण दोन अंकी नाटक बनले! तीसएक मिनिटांची एकांकिका ही दोन अडीच तासात आकाराला आणतांना ती ताणली जाणार नाही ना? कंटाळवाणी होणार नाही ना? असे अनेक प्रश्न आले पण त्याला परस्पर चोख प्रत्युत्तर प्रयोगातून मिळाले.
प्रताप फड यांना लेखक-दिग्दर्शक म्हणून व्यावसायिकाची दारे हक्काने उघडली गेली. यात ‘अनन्या’ ऋतुजा बागवे प्रगटली. तशी व्यावसायिकवर तिची पहिलीच भूमिका असून त्यात ती रसिकदरबारी प्रथमवर्गाने पास झाली. देहबोलीतून अस्सलता यावी यासाठी ऋतुजाने चक्क मल्लखांबाचे धडे घेतले. तालमी केल्या.
दोन हात नसल्याची भूमिका पार करण्यासाठी शारीरिक परिश्रम कुठलीही तक्रार न करता केली. एकांकिकेचे नाटक होतय म्हणून नाट्यवर्तुळात एकच चर्चा त्यावेळी होती. प्रमोद पवार अनन्याचे बाबा बनले, सोबत विशाल मोरे, अनघा भामरे, अजिंक्य ननावरे, सिद्धार्थ बोडके- ही रंगकर्मींची ‘टिम’ निवडली गेली. जी फिट्ट शोभून दिसली. प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होत होते.
याचे पडद्यामागले सूत्रधार श्रीकांत तटकरे यांची प्रयोगाच्या जुळवाजुळवीसाठी एकच धावपळ होत असल्याचे दिसले होते. अनेक पुरस्कारांचे मानकरी हे नाटक ठरले पण निर्माते सुधीर भट गेल्याने त्याची पोकळी चिरंजीव संदेश आणि पत्नी कांचन हे भरून काढायचे. प्रयोगाच्या वेळी ते जातीने उपस्थित असायचे. २०१७-२०१८ हे वर्ष ‘अनन्या’ने गाजविले. सर्व ‘टिम’चे नाटकासाठी सुरू असलेले झपाटलेपण हे अगदी विंगेतूनही बघण्याचा योग आला.
याच सुमारास व्यावसायिकवर भरत जाधव याचे वयोवृद्ध भूमिका असणारे ‘वेलकम जिंदगी’ हे एक हृदयस्पर्शी नाटक आलं होतं. तर देहदानाबद्दल जागृतता असणारे ‘फायनल डिसीजन’ देखिल पोहचले होते. ब्युटीपार्लरमधली हळुवार प्रेमकथा ‘खळी’चे प्रयोग सुरू होते. अशी नाटके ही ‘व्यावसायिक’वर या काळात चर्चेत जरूर होती पण विषयाच्या वेगळेपणामुळे एक अप्रतिम स्फूर्तीदायी नाट्यकृती म्हणून ‘अनन्या’ने दोनशे प्रयोगांवर विक्रम नोंदविला. दौऱ्यावर प्रयोगांसाठी ठेकेदारांची चढाओढ होतीच.
‘अनन्या’चे प्रयोग बघण्यासाठी हिंदी, गुजराती आणि इंग्रजी रंगभूमीवरले दिग्गजही पोहचले. गुजराती नाटकासाठी हक्कही देण्यात आले. अन्य भाषेतही याचे काही प्रयोग झाले पण मराठी ‘अनन्या’ नाटकाची उंची कुणी गाठू शकले नाहीत. एकांकिकाकार, नाटककार, चित्रपटकार या तिन्ही भूमिकेत प्रताप चमकला. तिन्ही माध्यमांवरली हुकमत निर्मितीतून सिद्ध केली. प्रत्येक ‘आविष्कार’ हा ‘अनन्या’ची आणखीन ओळख देणारा ठरला. हा माध्यम बदलातील वळणावरला एक चमत्कार व विक्रमच जसा ठरलाय. प्रत्येकवेळी साऱ्या कसोट्यांवर यशस्वी होण्याचे बळ मिळत गेलंय.
या नाटकाची तिसरी पायरी ठरली ती चित्रपटाची. ‘रुईया’ कॉलेजच्या कट्टयावरून सुरू झालेला हा प्रवास चित्रपटगृहापर्यंत पोहचला. यंदाचे २०२२ हे वर्ष अनन्याला एका उंचीवर घेऊन गेलं. यात ‘अनन्या’ बनली ऋता दुर्गुळे. तिचे बाबा झालेत योगेश सोमण. या माध्यमांतरात प्रताप फड कायम राहिले. तिन्ही बदलाचे साक्षीदार बनलेत. रवी जाधव निर्माते असूनही त्यांनी याची सूत्रे प्रतापकडे सोपविली. रंगमंच ते कॅमेरा या बदलात कथानकात अनेक नवे तपशिल अलगद आले. व्यक्तिरेखातील पैलू बहरले आणि एकांकिकेपासून सुरु झालेली एक गोष्ट नव्या चष्म्यातून बघण्याची संधी मिळाली. जी प्रत्येक वळणावर भुरळ पाडणारी ठरलीय.
या तिन्ही कलाकृतीची तुलना करणे कदापि शक्य नाही. कारण तिघांनी आपल्याला उपलब्ध अवकाशात ‘अनन्या’ उभी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेत. २००८ ते २०२२ या पंधराएक वर्षाच्या प्रवासात यातलं नाट्य हरविलेलं नाही किंवा ते हरवू दिलेलं नाही. ही बाब प्रामुख्याने नजरेत भरते. पदरमोड करणारी स्पर्धेतील हौशी रंगभूमी ते सिनेमानगरीतला शंभर टक्के धंदेवाईक अर्थव्यवहार अशा या वाटेवरला ‘त्रिआविष्कार’ ‘अनन्या’ने अनुभवला!
स्पृहा जोशी, ऋतुजा बागवे आणि ऋता दुर्गुळे या तिघा ‘अनन्या’ने आपली भूमिका दमदारपणे उभी करून एक प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक आविष्कारात तिघा अभिनेत्रींची दुसऱ्याशी तुलना होणं तसं स्वाभाविक जरी असलं तरी त्यांची ही ‘परीक्षा’च होती. प्रत्येक माध्यमातलं तंत्र-मंत्र आणि त्याची बलस्थाने ही जपली गेलीत.
मराठी रंगभूमीच्या इतिहासात ‘सकस निर्मितीची प्रयोगशाळा’ असलेल्या कॉलेजच्या एकांकिकेचा प्रभाव हा नाटक आणि चित्रपटापर्यंत पोहचू शकतो याचे एक उदाहरण म्हणून ‘अनन्या’ आदर्श ठरलीय. नियतीपुढे हार न मानता त्यावर मात करण्याची ऊर्जा यातून मिळतेय, हे नाकारून चालणार नाही.
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com