राज्याच्या कलासंचालक पदावर नियुक्ती झाल्यानंतर पुढच्या कामाच्या नियोजनाविषयी प्रा. विश्वनाथ साबळे सांगतात की, देशातील कोणत्याही राज्यात चित्रकलेसाठी स्वतंत्र कला संचालनालय नाही. फक्त महाराष्ट्र हे असं राज्य आहे.जिथे चित्रकलेसाठी स्वतंत्र कला संचालनालय आहे. या कला संचालनालयाची १९६५ ला स्थापना झाली.
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये कला शिक्षण कसं असावं, त्याचा अभ्यासक्रम, ध्येय धोरणे, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कला संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. कला शिक्षणाच्या संदर्भातील सगळ्या गोष्टी कला संचालनायलय बघतं. कला संचालनालयाच्या आधी जे. जे. स्कूलची स्थापना १८५७ ला झाली आहे.
साधारण १८८० पासून आपल्याकडे पेंटींग, शिल्पकला असे सगळे कोर्सेस आहेत. त्याच काळात ड्रॉईंगची ग्रेड परीक्षा घ्यायला सुरुवात झाली. आपल्याकडे शाळेत ड्रॉईंग शिकवण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक असणे खूप आवश्यक आहे. ड्रॉईंग हा विषय शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवला जावा, यासाठी प्रशिक्षित टीचर असणं गरजेचं आहे. जे. जे.मध्ये कला प्रशिक्षणाचा वर्ग आहे. इथून ट्रेनिंग घेतलेले सगळे शिक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांवर ड्रॉईंग शिकवतात.
ते पुढे सांगतात की, लॉकडाऊनच्या अगोदर आपण शाळेमध्ये एक सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेनुसार जास्त विद्यार्थ्यांचा कल हा ड्रॉईंगकडे जाणारा होता. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात कलेच शिक्षण हे प्राथमिक स्तरापासूनच दिलं जातं. बाकीच्या बोर्डांकडे ड्रॉईंगचे प्रशिक्षित टीचर नसतात.
महाराष्ट्रात कला शिक्षणाचा विचार खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने झाला आहे. परंतु सध्या अनेक ठिकाणी कला शिक्षक रिटायर झाल्यानंतर त्या पोस्ट भरल्या गेलेल्या नाहीत. अनेक शाळांमध्ये बी. एड. झालेले शिक्षक ड्रॉईंग विषय शिकवत आहेत. त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या विषयाचं महत्त्व कमी झालं.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आर्ट आणि क्राफ्ट या विषयांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. कारण विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये कलेचं खूप मोठं योगदान आहे. अनेक शाळांमधून अशा तक्रारी आल्या आहेत की ड्रॉईंग टीचर भरले जात नाहीत. ते कला संचालनालयासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. सध्या कलेच्या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. रोजगारासाठी हे शिक्षण महत्त्वाचं आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमाविषयी साबळे सांगतात की, ड्रॉईंगच्या दोन ग्रेड परीक्षा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट घेतल्या जातात. त्या खूप जुन्या परीक्षा आहेत. दहावीत यातली दुसरी परीक्षा पास झालेल्यांसाठी काही गुण दिले जातात. या परीक्षा अजून चांगल्या पद्धतीने कशा घेता येतील, हे आम्ही बघणार आहोत.
महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल सांगायचं तर, राज्यात विविध ठिकाणी ४ शासकीय संस्थांमध्ये कलेच्या डिग्रीचं शिक्षण दिलं जातं. तसेच ३१ अनुदानित आणि १२५ च्या आसपास विना अनुदानित संस्था आहेत. तिथल्या अभ्यासक्रमाचं आजच्या काळानुसार अपग्रेडेशन करणं हा आमचा प्रयत्न आहे. लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया थांबली होती. आता पुन्हा ही प्रक्रिया सुरु करायची आहे.
नवीन शैक्षणिक धोरण आल्यामुळे सगळे अभ्यासक्रम रिस्ट्रक्चर होतील तसेच कलाकार जे तयार होतात. त्यांना सुविधा देता येतील का हे पाहावे लागेल. जहाँगीर आर्ट गॅलरीसारखी गॅलरी आहे. तिथे प्रदर्शन भरवता येतं. अशा आर्ट गॅलरी सगळीकडे नाहीत. कलाकारांना प्रॅक्टीस करण्यासाठी स्टुडिओ लागतात ते नाहीत. ते उपलब्ध करता येतील का यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शिक्षकांची रिक्त पदं भरणं, शिक्षकांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम घेणं, हा खूप महत्त्वाचा विषय आहे.
मुलांना कला विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून काय केलं जातं ? असं विचारलं असता साबळे म्हणाले की, चित्रकलेच्या ग्रेड परीक्षेसोबतच आपल्याकडे ड्रॉईंगची स्पर्धाही घेतली जाते. शालेय स्तरावर ती होते. एकूण ५, १० लाख विद्यार्थी त्यात बसतात. अशा परीक्षा आणि स्पर्धांमध्ये पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची चित्रं आमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करता येतील का ? ते बघावे लागेल. या विद्यार्थ्यांसाठी अनेक पातळीवर वर्कशॉप घेता येतील का हादेखील प्रयत्न सुरु आहे. या विषयाचा पुढे कसा फायदा होऊ शकतो, यासाठी त्यांना शालेय स्तरावर मार्गदर्शन करता येईल.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्य कला प्रदर्शन आपण आयोजित करतो. ते प्रत्येक जिल्ह्यात रोटेट होते. त्या प्रदर्शनामध्ये पेंटींग, स्कल्पचर आणि टेक्सटाईल डिझायनिंग , सिरॅमिक, मेटर, अप्लाइड आर्ट आहे. सर्व विभागातले विद्यार्थी या प्रदर्शनात भाग घेतात. निवडक कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या जातात. उत्कृष्ट कलाकृती करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात. हा एक शासनाचा चांगला उपक्रम आहे.
कलेविषयीचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन यामुळे बदलतो. चित्रकलेच्या सगळ्या प्रकारांची सगळ्यांना माहिती होते. प्रोफेशनल आर्टिस्टचंही प्रदर्शन राज्य कला संचालनालयामार्फत भरवलं जातं. जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये हे भरवलं जातं. पुरस्कारही दिले जातात. मागच्या वर्षीपासून निवडक कलाकारांसाठी वर्कशॉपही भरवलं जातं. ऑन द स्पॉट पेंटींगचं वर्कशॉप आयोजित करण्यात येतं.
यामुळे कलेचा विचार, माध्यमं माहिती होतात. कला समजायला मदत होते. चित्रकलेची भाषा समजायला मदत होते. ती पोहोचवणं हे उद्दीष्ट आहेत. आपल्याकडे मंदिरे, लेणी असा समृद्ध वारसा आहे. कातळशिल्पही आहेत. भाषा समजली तर संस्कृतीबद्दलच्या या मानकांना समजून घेण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल.
जेजेमधल्या अनुभवाचा कलासंचालक म्हणून काम करताना कसा फायदा होतो हे सांगताना ते म्हणाले की, इथे वर्कश़ॉप आयोजित होतात. महाराष्ट्रातल्या इतर विद्यार्थी आणि कलाकारांनाही आम्ही त्यामध्ये सामावून घेतो. तो चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही असे उपक्रम होतात.
जेजेमधल्या उपक्रमांप्रमाणेच महाराष्ट्रभर असे उपक्रम राबवण्याचा मानस आहे. त्याचा फायदा होईल. अध्यापन पद्धती बदलल्या आहेत. आभासी झालं आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर शिकवण्यासाठी होत आहे. मात्र याला संशोधनाची जोडद्यायचा विचार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी जेजेमध्ये जे प्रयत्न झाले ते महाराष्ट्रात करायचे आहेत. माजी विद्यार्थ्यांचं स्थानिक पातळीवरील कलाकारांना मार्गदर्शन देता येईल. कला शिक्षणासाठी ठोस काम करण्याची गरज आहे.
शाळेत कला विषय कसा शिकवायला हवा याविषयी ते सांगताता की, कला शिक्षणाला शाळेत प्राधान्य दिलं जात नाही. कारण तिथे प्रशिक्षित शिक्षकच नाहीत. ते असायला हवेत. तर विद्यार्थ्यांना फायदा होईल. पाठांतरापेक्षा विद्यार्थ्यांना विचार करायला लावणं हा शिक्षणाचा मुळ हेतू आहे. विचाराला चालना देण्याची गरज आहे.
पूर्णवेळ शिक्षक असतील तर मुलांना त्या विषयाची गोडी लागेल. कला विषयाचा वापर करुन इतर विषय शिकवले तर मुलांना विषय चांगले समजतील. सध्याच्या शिक्षकांना अध्यापनात कोणतीही अडचण येत नाही. एक कला शिक्षक असला तर संपूर्ण शाळेतलं वातावरणचं बदलतं. शाळा कलात्मक होते. भिंती सजतात. एक सकारात्मक वातावरण तयार होतं. त्यांना फ्रिडम देऊन त्यांच्या कलागुणांचा वापर करुन शाळेत काम करायला हवं. एक कला शिक्षक शाळेचं स्वरुप बदलू शकतो.
आत्तापर्यंत पूर्णवेळ कलासंचालक असा नव्हता. तात्पुरत्या नेमणुक्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शाळांचे जे प्रश्न आहेत. ते पूर्णपणे सोडवले गेले नाही. शिक्षकांसोबत चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे. पासआऊट विद्यार्थ्यांसाठीही काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शासन याबाबतीत सकारात्मकरित्या काम करत आहे. आता माझी जबाबदारी आहे की सगळे प्रश्न नीट सोडवले जातील.
साधना राजवाडकर
sanarajwadkar@gmail.com