children listening story
आजी घरी आली की रात्री तेजोमयीला गोष्ट सांगायची. आजीशी मैत्री झाल्यावर अलेक्झांडर आजीजवळ गोष्टीच्या वेळी बसू लागला. एखाद्या प्रसंगी तेजोयमीने मान डोलावली की हाही मान डोलवायचा. तुला रे काय कळतं यातलं? असं एकदा आजी बोलून गेली तर स्वारीने मागे पाय घासून आाणि शेपटी हलवून आपली नाराजी व्यक्त केली.
आजी, असं काही म्हणू नकोस गं. त्याला सगळं कळतं. तेजोमयी म्हणाली.
बरं बाई बरं, यापुढे त्याला काहीसुध्दा म्हणणार नाही, आजी म्हणाली.
आजीने अर्धवट राहिलेली गोष्ट पुन्हा सांगायला सुरुवात केली. गोष्ट ऐकता ऐकता तेजोमयीचा डोळा लागला. अलेक्झांडर मात्र कान देऊन ऐकतच होता. तेजोमयी झोपल्याचं बघून आजीने गोष्ट सांगणं थांबवलं.
तूसुध्दा झोप… आजी म्हणाली. तिचेही डोळे जड झाले होते. पण अलेक्झांडर तिथून जाण्याचं नाव घेईना. तो आजीकडे बघू लागला नि आजी त्याच्याकडे बघू लागली.
काही सेकंद अशीच गेली. कशाचाच आवाज येत नाही हे बघून आई, आजीच्या खोलीत डोकावली. अलेक्झांडर आणि आजी दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत असून दोघेही शांत असल्याचं बघून आईला आश्चर्य वाटलं.
काय रे ठोंब्या, कशी वाटली आजीची गोष्ट? आईने त्याला विचारलं.
अगं तेजो, झोपी गेल्याने गोष्ट अर्धवटच राहिली. मग तो कसा काय सांगणार, गोष्टी कशी होती ते. आजी म्हणाली.
हो का? अच्छा असं आहे तर?
म्हणजे गं काय?
बहुतेक ठोंब्याच्या लक्षात आलंय, गोष्ट अपूर्ण असल्याची. म्हणूनच तो बसलाय असा तुमच्याकडे बघत. पूर्ण करुन टाका की गोष्ट.
आँ! काहीतरीच काय. अगं मग, उद्या तेजोस पुन्हा सांगावं लागेल ना. आजी नाराजी व्यक्त करत म्हणाली.
आजीच्या खोलीत काय चाललय हे बघण्यासाठी बाबा डोकावले. अलेक्झांडरला अपूर्ण गोष्ट पूर्ण ऐकायची असून आजीला इच्छा नसल्याचं बाबांच्या लक्षात आलं.
सांग गं त्याला. बाबा म्हणाले. अलेक्झांडरने आनंदाने मान हलवली. पण आजीचा नन्नाचा पाढा कायम होता.
आता काय करावं बरं? अलेक्झांडर तिथून उठायला तयार नव्हता.
मी तुला गोष्ट सांगितली तर चालेल ना… बाबा त्याला म्हणाले.
तुला गोष्टी येतात? कधी तेजोला सांगताना दिसला नाहीस. आजी आश्चर्याने म्हणाली. आईनेही आश्चर्य व्यक्त केलं.
नाही म्हणजे, अलेक्झांडरला मी सांगू शकतो गोष्टी. बाबा हातातल्या पेपरकडे बघत म्हणाले.
या पेपरमध्ये गोष्ट आहे की काय? आजी हसत म्हणत म्हणाली.
हसू नकोस गं, बघ आता या पेपरमधूनच एखादी गोष्ट काढतो की नाही ते. बाबा आजीस म्हणाले. त्यांनी पुरवणीचं पानं उलट सुलट केलं. त्यांना एका पानावर काहीतरी दिसलं. ते उत्साहात म्हणाले, मिळाली गोष्ट. बाबा गोष्ट सांगू लागले. अलेक्झांडरने मान डोलवली.
ही गोष्ट आहे, पुस्तक वाचणाऱ्यांना काय म्हणतात याची. तर एक होता सलीम, तो होता बिब्लीओबिबुली (BIBLIOBIBULI). एक होता नेपोलियन, तो होता बिबिलोफाइल (BIBLIOPHILE).
तू, काहीतरी काय बडबतोस? आजी बोलून गेली.
अलेक्झूस कळेल असं सांगा की… आई म्हणाली.
त्याला कळतं पण तुम्हाला कळत नाही… बाबा उत्तरले.
हो का? मग आता तुम्ही जी काय बडबड केली त्याचा काय बरं अर्थ. आईने विचारलं.
बिब्लीओबिबुली म्हणजे सतत पुस्तक वाचणारा नि बिबिलोफाइल म्हणजे ज्याला पुस्तकं खूप आवडतात नि तो त्यांचा संग्रह करतो.
कायरे अलेक्झू, बरोबर ना… बाबांनी अलेक्झांडरला विचारलं
अगदी बरोबर, अशा आशयाची मान त्याने डोलावली.
बृहस्पतीच लागला जणू… आजी जांभई देत म्हणाली.
तर एका जिनपिंगला बिब्लीचॉर (BIBLICHOR) फार आवडायचं. म्हणजे, जुन्या पुस्तकांचा जो गंध असतो तो! आई आणि आजी याविषयी काही विचारण्याआधीच बाबांनी सांगून टाकलं.
पुरं झालं तुझं हे बिब्ली पुराण. अलेक्झांडरला घेऊन जा तुमच्या खोलित. आजी जांभई देत म्हणाली. पण अलेक्झांडर उठायचं काही नाव घेईना.
अलेक्झू, एक होती मोनालिसा. ती होती हिअको डोकूशो (HEIKO DOKUSHO)…
डाकू होती का ती? आईने हसत विचारलं.
ती मोनालिसा खरंच डाकू होती. एखादं पुस्तक दिसलं की टाक त्यावर डाका नि घे वाचायला. हे पुस्तक वाचता वाचता आणखी एखादं पुस्तकं दिसलं की टाक त्यावर डाका नि वाचू लाग लगेच. म्हणजे ती एका वेळी अनेक पुस्तक वाचत राहायची.
खरंच… असे आश्चर्याचे भाव अलेक्झांडरच्या डोळ्यात उमटले.
तुला कंटाळा नाही का आला? आजीने अलेक्झांडरला विचारलं.
अं हं. अलेक्झांडरने नकारार्थी मान हलवली.
सांग बाबा, तुझ्या या लाडक्यास आख्खी डिक्शनरी. आजी वैतागून म्हणाली.
तर एक होती भूवनेश्वरी. ती होती रिडग्रेट (READGRET). म्हणजे कोणतंही पुस्तक वाचायला घेतलं की तिला वाटू लागे की,हे पुस्तक आधीच कां बुवा आपण वाचलं नाही.
बरं पुढे, आता आजी बोलून गेली.
म्हणजे तुम्हालासुध्दा यांच्या बडबडीत रस वाटायला लागला की काय? आईने आश्चर्याने विचारलं. आजी हसली.
पुढे काय? मीच की, म्हणजे सुंडोको (TSUNDKO)… आजी आणि आई हसल्या.
काय झालं हसायला?
याचा अर्थ तुम्हीच सांगा. तो नक्कीच तुम्हाला अचूक लागू पडू शकतो. म्हणून हसलो आई म्हणाली.
वाSव! मनकवडे आहात. तर मी म्हणजे सुंडोको. म्हणजे असं की जो पुस्तकं तर विकत घेतो पण ते कधीच वाचत नाही. बाबा काही क्षण थांबले नि आँ! असं स्वत:लाच म्हणाले.
हा हा हा ! आजी हसली.
ब ब च्या बडबडीत पोलखोल होऊन गेली, आई हसत म्हणाली.
या दोघीजणी कां हसताहेत हे लक्षात न आल्याने अलेक्झांडर दोघींकडे आळीपाळीने बघू लागला.
गोष्टीच्या सापळ्यात तुझे बाबा अलगद अडकले ठोंब्या. आई म्हणाली. आपण काहीतरी मोठ्ठा पराक्रम गाजवला असं अलेक्झांडरला वाटलं. त्याने स्वत:भोवती गिरकी घेऊन हा आनंद व्यक्त केला.
या गोष्टीचं तात्पर्य असं की जो पुस्तक वाचत नाही तो गोष्टी कशा सांगणार ? म्हणून यापुढे पुस्तकं वाचत जा. वेळ नाही हे कारण सांगू नको. असं बाबांचा कान पकडत आजी म्हणाली.
– सुरेश वांदिले