क्रूर असलेल्या ‘देवदासी’ या विकृत प्रथेविरुद्ध त्यांनी ‘देवनवरी’ हे नाटक लिहीले. देवदासी प्रश्नांच्या मुळापर्यंत ते पोहोचले. त्यातील व्यक्तिरेखा या वाचकांना आणि रसिकांना सुन्न करून गेल्या. ही प्रथा, त्यामागली पिळवणूक, स्वार्थ हा आजही संपलेला नाही. हे जरी खरे असले तरी विचारमंथन करण्याचे मोलाचे काम या संहितेने केलं, हे विसरून चालणार नाही. परिवर्तनाच्या वाटेवरले ‘देवदासी’ हे एक महत्त्वाचे पर्व म्हणावे लागेल.
‘नटसम्राट’ आणि विचारवंत डॉ. श्रीराम लागू हे देखील गज्वी यांच्या ‘किरवंत’ या संहितेच्या प्रेमात पडले. एवढंच नव्हे तर निर्मिती आणि प्रमुख भूमिकेची जबाबदारीही एक सामाजिक भान म्हणून त्यांनी स्वीकारली. ब्राह्मण जातीतून बहिष्कृत असलेला ‘किरवंत’ हा एक घटक. स्मशानकार्य त्याला करण्यास परवानगी पण अन्य पूजापाठाला बंदी. एक समाजशास्त्रीय रचनेवर नाटकातून प्रभावी भाष्य हे त्यांच्यातल्या नाटककाराने समर्थपणे केले ‘किरवंत’ म्हणजे स्मशाणात मर्तिकाला अग्नी देण्यापासून सर्व विधी करणारा ब्राह्मण. पण ब्राह्मण असूनही तो ब्राह्मणातला अस्पृश्य. पूजा करण्यास बाद ठरतो.
आणखीन एक नाटक ग्रामीण पार्श्वभूमीवर बेतलेले ज्यात जातीपातींचा पगडा आणि राजकारण याची चिरफाड करण्यात आली होती ते ‘वांझ माती’!
बेठबिगारांच्या ज्वलंत समस्येवर बेतलेले ‘तनमाजोरी’ जे राज्य नाट्यस्पर्धेपासून ते व्यावसायिक रंगभूमीपर्यंत पोहचले. त्यातील मालकाच्या भूमिकेत नाना पाटेकर यांनी बाजी मारली. हे नाट्य लंडनपर्यंत पोहचले. तिथे या नाटकाच्या संहितेचे प्रकाशनही झाले. ‘शोषक आणि शोषित’ यातला प्रश्न देश-विदेशात सून्न करून गेला. अगदी नाटकाच्या शीर्षकापासून ते सादरीकरणापर्यंत त्यातील ताकद ही सिद्ध होते. अभ्यासक्रमासाठीही या नाटकाच्या संहितेची निवड करण्यात आली आहे.
कला आणि कलावंत यावले नूर मोहम्मद साठे तसेच डॅम इट अनू गोरे (मूळ नाव व्याकरण) याही नाटकांनी वेगळ्या वळणावर रसिकांना नेलं. या दोन्ही संहिता प्रयोगक्षम असूनही तशा अंधारातच राहील्या. ‘जय जय रघुवीर समर्थ’ हे नाटकही स्फोटक. चर्चेत होते समाजाला वेठीस धरून स्वतःचे महत्त्व वाढविणाऱ्या बाजारू प्रवृत्तींच्या पंथ, मठाची चिरफाड या नाटकात आहे. आंधळा भक्त आणि दुसरीकडे दलाली प्रवृत्तीचे स्वार्थी यांच्याभोवती नाट्य प्रभावीपणे गुंफले आहे.
कायम संशोधन, नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले गज्वी यांनी २०११ या वर्षात जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्यांची पाहाणी करून दोन दिवस मुक्काम ठोकला. या अभ्यास दौऱ्यातून सहभागी सदस्यांनी एखादी नाट्यकृती आकाराला आणावी, हा त्यामागला त्यांचा हेतू होता. त्यातूनच ‘द बुद्धा’ हे मुक्तछंद नाट्य साकार झाले. या संहितेसंदर्भात अभ्यासक सुहासिनी कीर्तिकर म्हणतात- “यात बौद्ध धर्माचे पूर्ण स्वरूप, त्याचे आकलन आहे. सिद्धार्थ चरित्र आहे, विशेष म्हणजे, पतीपत्नी नात्यातून स्त्री विषयक आजच्या जाणीवा आहेत.” बुद्ध, यशोधरा आणि राहुल अशी पात्ररचना यात केली आहे.
मराठी नाटकाचे इंग्रजीत नाव का? यावर गज्वी म्हणतात, “बुद्धाची जागतिक विशाल प्रतिमा लक्षात घेता इंग्रजी नाव योग्य. अडीच हजार वर्षापूर्वी जन्मलेला बुद्ध. त्यांचं तत्त्वज्ञान हे भाषातीत. प्रदेशातीत. कालातीत. अगदी सर्वार्थाने!” एक काव्य आणि त्यातले नाट्य हे यातून प्रकाशात येते. वेगळ्या शैलीतलं नाट्य म्हणून ‘द बुद्धा’ वाचकांना खुणावते. याची संहिता पुस्तकरूपाने ‘मॅजेस्टिक’ने प्रसिद्धही केली आहे. मराठी भाषेच्या अभ्यासकांसाठी एक दालन महत्त्वाचे ठरले आहे.
‘शुद्ध बीजापोटी’ हे त्यांचे तसे दहावे पूर्ण नाटक. ज्याचा ‘भारतीय रंगभूमी’ने व्यावसायिकवर २००८ साली शुभारंभ केला. दिग्दर्शन राम दौड यांचे होते. तर मध्यवर्ती प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ. गिरीश ओक. नागवंशी बौद्ध मन आणि आर्यवंशीय हिंदू मन यांच्या वर्तमानकालीन जीवनाचं बिंब-प्रतिबिंब या नाट्यात ताकदीने मांडण्यात आलय. एक वेगळी भूमिका म्हणून डॉ. गिरीश ओक यांनी समर्थपणे प्राध्यापक उभा केला. जो ‘हटके’ विषय ठरला.
गज्वी यांचे १९९७ साली निर्मात्या लता नार्वेकर यांच्या श्रीचिंतामणीतर्फे आलेले ‘गांधी-आंबेडकर’ हे नाट्य. ज्याचे दिग्दर्शन चेतन दातार यांचे होते तर गांधींच्या भूमिकेत मंगेश भिडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर – किशोर कदम आणि विदूषक – भक्ती बर्वे. दोन डोंगरासारखी व्यक्तिमत्त्वे, वैचारिक भूमिका आणि विविध पातळ्यांवरल्या टोकाचे – विचार यामुळे राजकीय नाट्य झाले. ‘इतिहास जगवणारेच इतिहास घडवत असतात,’ हा संदेशही यातून ‘विदूषक’ देतो. तो महत्त्वाचा. गांधी आणि आंबेडकर यांचे वैचारिक दर्शन समर्थपणे प्रथमच या नाट्यातून झाले. ज्यातील जुगलबंदी विचार करायला लावणारी ठरली.
‘हवे पंख नवे’ हे नाट्य. त्याच वाटेवरले. जे २०१८ मध्ये रंगभूमीवर प्रगटले. अशोक हंडोरे यांचे दिग्दर्शन आणि बोधी रंगभूमीची निर्मिती होती. यात डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या भूमिका विक्रांत शिंदे आणि ज्ञानेश्वर सपकाळ यांनी केल्या होत्या. यासोबत रमाई, शारदा यांचीही पात्ररचना केली होती. एक वैचारिक नाट्य म्हणून नाट्याने मजबूत पकड दाखविली.
विधवा स्त्रियांचे जीवन आणि त्याच्या वाटेवरला भयानक संघर्ष हा ‘पांढरा बुधवार’ यात हळूवारपणे मांडला आहे. कुमारी माता आणि वांझ स्त्री या दोघींच्या भावभावना, त्यांच्या वेदना, त्यांच्या पुढची आव्हाने, यात आहेत.
कलाकृती या संस्थेने १९९६ च्या सुमारास त्यांचे ‘रंगयात्री’ हे नाटक रंगभूमीवर आणले. प्रफुल्लचंद्र दिघे यांचे दिग्दर्शन आणि दीपक जाधव यांची शेक्सपिअरची आणि डॉ. गिरीश ओक यांची विवेकची भूमिका होती. डॉ. ओक यांना त्या वर्षीचा अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. समांतर रंगभूमीवरले ‘शेक्सपिअर’चे प्रायोगिक नाटक म्हणून गाजले. ‘छबिलदास’मध्ये त्याचे प्रयोग झाले.
ज्या ‘छावणी’ नाटकाचे गज्वी यांच्या अमृत महोत्सवानिमित्य एकाच दिवशी एकाच नाट्यगृहात दिवसभरात तीन प्रयोग होणार आहेत. ते नाटक प्रयोगापूर्वीच वादळी ठरलं आहे. गेली सात वर्षे याची संहिता प्रयोगापासून रोखली होती. ‘देशद्रोही, घटनाविरोधी’ असाही शिक्का यावर बसला. अखेर चर्चा, बैठका यानंतर या नाट्याला प्रयोगासाठी अनुमती मिळाली आहे. शोषित, दलित, आदिवासी यांना न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली हिंसा करणाऱ्या प्रवृत्तींचा पर्दाफाश यात आहे. आज देशाचे संविधान वाचविण्याची गरज आहे, असा ‘मेसेज’ त्यातून देण्याचा प्रयत्न आहे. अर्थात या प्रयोगानंतर विषय, आशय यावर अधिक चर्चा घडू शकेल! यावर एका मुलाखतीत गज्वी म्हणाले होते, “या नाटकाचा विषय ज्वलंत आहे. सध्या आरक्षणाने सर्वांचेच डोके फिरले आहे. एकही जात अशी नाही की जी स्वतःला राखीव जागा नको असं म्हणत नाही. हा देशच काही दिवसांनी ‘राखीव’ होईल की काय, ही शंका वाटते. आपला देश तसा गरीब नाही पण देशाची संपत्ती काही विशिष्ट लोकांपूरती मर्यादित आहे. देशाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आणली पाहिजे!, हाच ‘छावणी’चा विषय आहे!”
एकांकिका, काव्य, कथा, कादंबरी यापासून सुरू झालेला प्रेमानंद गज्वी यांचा साहित्यप्रवास हा नाटकापर्यंत पोहोचला. त्यांच्या प्रत्येक नाटकात समाजातील एखाद्या समस्येवर प्रखरतेने प्रकाशझोत आहेच. निव्वळ करमणूक करण्याचे माध्यम म्हणून ते नाट्य लेखनाकडे बघत नाहीत. तर एक प्रभावी वैचारिक माध्यम समजतात. त्यामुळे दबलेल्या समाजाच्या समस्या मांडून त्यांच्यातला नाटककार हा समाधानी होतोय या प्रवासाला अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा!
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com