मराठी नाटकांना पावणेदोनशे वर्षाची परंपरा आहे. काळानुरूप त्यात बदल होत गेले. अगदी विषयापासून ते सादरीकरणापर्यंतची त्यात विविधता आहे. मराठी माणसाचे दोन ‘विकपॉईंट’ म्हणून ओळखले जातात. त्यात एक राजकारण आणि दुसरं नाटक! परिस्थिती बदलत गेली. मनोरंजनाचे शेकडो पर्याय समोर उभे ठाकले पण तरीही नाटकांबद्दलचे प्रेम हे कमी झालेले नाही. शनिवार – रविवार वर्तमानपत्रातली दोन पाने ही नाटकासाठी गच्च भरलेली असतात. घरबसल्या चॅनलवरली करमणूकीची सवय झालेल्या कोरोनाच्या दोन वर्षाच्या मध्यंतरानंतरही नाट्यगृहे बहरू लागली आहेत. एकूणच ‘नाटक’ हे क्षेत्र रसिकांच्या दृष्टीने आजही बाद झालेलं नाही. होणार नाही. त्यामागे कोट्यवधी रुपयांचे अर्थचक्रही आहे. शेकडोंना रोजगाराची संधी देखिल आहे… असो.
आता मराठी रंगभूमीवरही गाजलेली नाटके हा विषय तसा संशोधनाचा. अथांग असा पसरलेला. तरीही त्याची मांडणी करतांना संगीत नाटके, गद्य नाटके, लोकनाट्ये प्रायोगिक – समांतर नाटके, एकांकिका – दीर्घांक, व्यावसायिक नाटके असे वर्गीकरण करता येईल. जगातील सर्वच देशातील नाटकांचा विचार करता त्यांचा शुभारंभ हा कुठेतरी देवाधर्माशी, रितीपरंपरेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जोडलेला दिसतो. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने मराठीतही नाट्य जन्माला आलय. आज ते एक पूर्णवेळ व्यवसायच बनलय.
१८८१ च्या सुमारास मराठी रंगभूमीवर सुरू झालेला संगीत नाटकांचा प्रवाह हा पुढे किर्लोस्कर, खाडिलकर, देवल, गडकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, आचार्य अत्रे, मो. ग. रांगणेकर यांनी कल्पकतेने पुढे नेला. पण १९३५ नंतर संगीत नाटकांना काहीशी मरगळही आली होती. त्यावेळी पत्रकार, नाटककार विद्याधर गोखले यांनी ‘मंदारमाला’ नाटकाने नवी उर्जा भरली. चित्रपटात शास्त्रीय संगीत वाढले होते. त्यावेळी रसिकांच्या बदलत्या अभिरुचीला सामोरं जाण्यासाठी त्यांनी करिष्मा केला. ‘मंदारमाला’ त्यात आघाडीवर ठरले. मंदारमालाचे शंभरावर प्रयोग मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या रंगमंदिरने केले. नंतर राजाराम शिंदे यांनी त्यांच्या ‘मंदारमाला’ने जबाबदारी घेतली आणि उभ्या देशभरात दौरे करून नाबाद चारशे प्रयोगांचा महाविक्रम केला. त्यावेळी अन्य राज्यात दौरे आणि प्रयोगांचा हा विक्रम म्हणजे एक चमत्कारच होता.
संगीत नाटकाच्या वाटेवर अनेक कलाकारांवर रसिकांनी जीव ओतून प्रेम केले त्यात बालगंधर्व नंबरवनवर आहेत. प्रयोग हमखास हाऊसफुल्ल होणारच! पुढे हा मान डॉ.काशिनाथ घाणेकर आणि प्रशांत दामले यांनी पटकावला. डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, भरत जाधव, संतोष पवार, विजया मेहता, निळू फुले, मच्छिंद्र कांबळी यांच्याभोवतीही रसिकांचे आकर्षण होते. त्यांच्या भूमिका बघण्यासाठी नाटकाला गर्दी होत होती. भालचंद्र पेंढारकर, फैय्याज, किर्ती शिलेदार, मा. दत्ताराम, पं. वसंतराव देशपांडे, रामदास कामत, मा. दिनानाथ, केशवराव भोसले यांच्या नाटकातील पदांनी रसिकांना रात्र-रात्र जागविले! गाजविले!!
काही गाजलेल्या संगीत नाटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात संशयकल्लोळ, शारदा (गोविंद बल्लाळ देवल), राजसंन्यास, एकच प्याला, भावबंधन (राम गणेश गडकरी), सौभद्र, शाकुंतल (अण्णासाहेब किर्लोस्कर), कीचकवध, भाऊबंदकी, मानापमान, स्वयंवर, द्रौपदी (कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर) स्वरसम्राज्ञी, पंडितराज जगन्नाथ, मदनाची मंजिरी, मंदारमाला, सुवर्णतूला, मेघमल्हार (विद्याधर गोखले), कट्यार काळजात घुसली (पुरुषोत्तम दारव्हेकर), ययाती आणि देवयानी (वि. वा. शिरवाडकर), मत्स्यगंधा (वसंतराव कानेटकर) प्रितीसंगम, लग्नाची बेडी (आचार्य अत्रे), कुलवधू (मो. ग. रांगणेकर), अवघा रंग एकचि झाला (मीना नेरुरकर), रेशमगाठी (आनंद म्हसवेकर), दुरीतांचे तिमिर जावो (बाळ कोल्हटकर), देवबाभळी (प्राजक्त देशमुख).
१९२० ते १९५० या काळात अनेक राज्यातील – देशातील घडलेल्या घटना आणि चळवळींचे परिणाम हे नाटकातील विषयांवर पडले. महात्मा फुले यांचे तृतीय रत्न किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उ:शाप, तसेच प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘खराब्राह्मण’. या नाटकांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. ही तिन्ही नाटके एका टप्प्यावरली ठरतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकूण तिन नाटके लिहिली. त्यातले पहिले ‘उ:शाप’, दुसरे ‘संन्यस्त खड्ग’ आणि तिसरे ‘सं. उत्तरक्रिया’. ही तिन्ही नाटके त्यांनी चक्क रत्नागिरीत पोलिसांच्या नजरकैदेत गजाआड लिहीली. त्यांच्यातला सशक्त क्रांतीचा पूरस्कर्ता ‘संन्यस्त खड्ग’ यात दिसतो.
तर ‘उ:शाप’मध्ये मुस्लीम राज्यकर्त्यांना विरोध आहे. काहीसा प्रचारी थाट संवादात असला तरी तत्कालीन राजकीय – सामाजिक परिस्थितीचे पडसाद त्यात आहेत. ‘किर्लोस्कर’ आणि ‘देवल’ यांनी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ उभा केला. तिथपासूनचा हा प्रवास. अगदी आजही २०२२ वर्षात विक्रमी पुरस्काराचे मानकरी ठरलेले प्राजक्त देशमुख यांचे संगीत देवबाभळी! म्हणजे संगीत नाटकाबद्दलचे आकर्षण रसिकांमध्ये कायम आहे. पूर्वीप्रमाणे संगीत नाटके जरी संख्येने रंगमंचावर येत नसली तरीही दर्जेदार नाटकांचे स्वागत हे आजच्या संगणकयुगात होतेय, हे दखल घेण्याजोगं आहे.
गद्य नाटकाच्या जमान्यात पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, वि. वा. शिरवाडकर, बबन प्रभू, आचार्य अत्रे, पुरुषोत्तम दारव्हेकर, विश्राम बेडेकर, रणजित देसाई, मधु मंगेश कर्णिक, चिं. त्र्यं. खानोलकर, विजय तेंडुलकर, प्रशांत दळवी, प्रेमानंद गज्वी, रत्नाकर मतकरी, मधुसूदन कालेलकर, जयवंत दळवी, गंगाराम गवाणकर – या नाटककारांनी एक पर्व गाजविले. बबन प्रभू यांच्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ हा फार्स; आचार्य अत्रे यांचा ‘तो मी नव्हेच’मधला कोर्ट ड्रामा आणि फिरता रंगमंच; शाहीर दादा कोंडके यांनी गाजविलेले ‘विच्छा माझी पुरी करा!’ हे वसंत सबनीस यांचे लोकनाट्य, विजय तेंडुलकरांचे शैलीप्रधान घाशीराम कोतवाल; गंगाराम गवाणकर यांचे मालवणी बोलीभाषेला मानाचे स्थान देणारे ‘वस्त्रहरण’; रत्नाकर मतकरी यांचे ‘वास्तवतेकडे जाणारे लोककथा ७८’; पु. ल. देशपांडे यांचे मराठी शब्दांची महती सांगणारे ‘ती फुलराणी’; केदार शिंदे यांचे ‘सही रे सही’… यादी अपूर्ण राहील. एकूणच विविधतेनं नटलेल्या अशा शेकडो नाट्यकृतींनी मराठी रसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य केले…
मराठी रंगभूमीवरली ‘निवडक ११ नाटकांच्या नवलकथा’ संग्रही करण्याचा योग नाट्यअभ्यासकांसाठी जुळून आला होता. निवडक ११ नाटके आणि त्यातही ती गाजलेली असावीत, असा संयोजकांचा हेतू त्यामागे होता. २००७ साली माझा हा प्रकल्प पूर्ण झाला. कणकवली नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा लालन सारंग यांनी या पुस्तकाचे नाट्य संमेलनात प्रकाशन केले आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने संदर्भग्रंथ म्हणून याची दखल घेतली होती.
एका काळातील मानकरी नाटके म्हणूनही या संकल्पनावर शिक्कामोर्तब झालाय. त्यात निवडलेल्या नाटकात – आचार्य अत्रे यांचे तो मी नव्हेच; पु. ल. देशपांडे यांची ‘ती फुलराणी’, वसंत सबनीस यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’, जयवंत दळवी यांचे ‘पुरुष’, प्रा. मधुकर तोरडमल यांचे ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, वसंत कानेटकर यांचे ‘अश्रूंची झाली फुले’, विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाईंडर’, गंगाराम गवाणकर यांचे ‘वस्त्रहरण’, वसंत कानेटकर यांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, दिलीप प्रभावळकर यांचे ‘हसवाफसवी’, वि. वा. शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’! यांचा समावेश केला. ही ‘माईलस्टोन’ नाटके आहेत. त्यांना सलाम!
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com