अंधेरीतील भव्य क्रीडा संकुलात राज ठाकरे यांनी १९९६ साली ‘लता मंगेशकर संगीत रजनी’चे आयोजन केले असताची आठवण. भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मला संगीतकार श्रीकांतजी ठाकरे यांनी ‘विशेष निमंत्रित ‘ अशी या संगीतमय सोहळ्याची आमंत्रण पत्रिका दिल्याने मी स्टेजपासून अवघ्या चौथ्या रांगेतच असल्याने लतादीदी यांच्या गायनाचा आनंद तर झालाच, पण अगदी त्या स्टेजवरील वादकाना एखादी छोटी सूचना त्या करत, अनेक गाण्यातील संगीताची छोटी छोटी वाद्यरचना त्यांच्या लक्षात आहे याचेही दर्शन घडले.
फार पूर्वी पहिले गाणे आणि मग संगीत अशा पध्दतीने गाणी जन्माला येत. एकेका गाण्यावर चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, काही वादक यात तासनतास चर्चा होई, वाद होत आणि प्रत्यक्ष गाणे रेकाॅर्डिंगच्या वेळी पूर्ण वाद्य संच असे. हे सगळेच त्यांच्या लक्षात होते. आपल्या कामातील भावनिक गुंतवणूक आणि बांधिलकी म्हणतात ती हीच.
भारतीय चित्रपट, त्याचे संगीत आणि सर्व प्रकारचे संगीत यांची भारतीय संगीताची जगभरातील ओळख म्हणजे लता मंगेशकर! लता मंगेशकर म्हणजे एक प्रकारचे विद्यापीठ. ज्यात एकीकडे संगीत कला, गायन आणि पाश्वगायन कौशल्य आहे. गायन म्हणजे गैरफिल्मी गाणी. भावगीते, भक्तीगीते, भजन, कोळीगीत वगैरे तर पाश्वगायन म्हणजे त्या त्या चित्रपटाच्या नायिकेसाठी गाणे.
तेव्हा तो आवाज त्या अभिनेत्रीचाही वाटायला हवा. लताजींच्या गायनातील कमालीची विविधता यात दिसते. उठाये जा उनके सितम और जिए जा (अंदाज, सन) ऐकताना डोळ्यासमोर नर्गिस येते. आजा रे परदेसी मै तो कब से खडी इस पार (मधुमती) ऐकताना वैजयंतीमाला आठवते. तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना (अनाडी) आठवलं तरी नूतन आठवतेच. मोहे पनघट पे नन्दलाल छेड गयो रे (मुगल-ए- आझम) ऐकताना डोळ्यासमोर मधुबाला येणारच. आप की नजरो ने समजा प्यार के काबिल मुझे (अनपढ) हे माला सिन्हा गातेय असे वाटते. काटो से खिच के ये आंचल (गाईड) हा वहिदा रहेमानचा आवाज वाटतो.
नैना बरसे रिमझिम रिमझिम (वह कौन थी) हे साधनासह आठवते. आप मुझे अच्छे लगने लगे (जीने की राह) तनुजाच्या खट्याळ आणि बोलक्या भावमुद्रेसह आठवते. सुनरी पवन, पवन पुरवया मै हू अकेली (अनुराग) मौशमी चटर्जीसह डोळ्यासमोर येते. बेताब दिल की तमन्ना यही है (हसते जख्म) गुणगुणताना प्रिया राजवंश आठवणारच. मेघा छाऐ आधी रात (शर्मिली) हे जणू राखीच गातेय असे वाटते. जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग (दाग) हे डोळ्यासमोर शर्मिला टागोरलाच आणते.
यह कैसा सूरमंदिर है जिसमे संगीत नहीं (प्रेमनगर) हे हेमा मालिनीच याची खात्री असते. मेरा पढने मे नहीं लागे दिल क्यू (कोरा कागज) हे जया भादुरीच्या सर्व अदाकारीसह आठवते. रजनीगंधा फूल तुम्हारे महके यू ही जीवन मे (रजनीगंधा) ऐकताना विद्या सिन्हाच हे घट्ट समीकरण असते. हमे और जीने की चाहत न होती (अगर तुम न होते) हे रेखाच गातेय असे वाटते. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. लताजी त्या अभिनेत्रींच्या आवाजात गायल्या असा फिल येतो हे त्यांच्या पाश्वगायनातील खूपच मोठे वैशिष्ट्य आहे. भावगीते असोत अथवा चित्रपट गीते त्या सगळ्याना न्याय देताना स्वतः आनंद घेत तोच आनंद इतरांनाही दिला आहे.
लता मंगेशकर यांनी उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण ८२२६ गाणी गायली असा एक संदर्भ आहे. त्यात ५३२८ हिंदी चित्रपट गीते, १९८ गैरफिल्मी हिंदी गाणी, १२७ अप्रकाशित हिंदी चित्रपट गीते (म्हणजे जे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत), ४०५ मराठी गीते (त्यात मराठी चित्रपट आणि इतर), तसेच बंगाली, संस्कृत, गुजराती, पंजाबी वगैरे भाषेतील चित्रपटातील गाणी.
या सगळ्याची बेरीज ८२२६ इतकी आहे. अतिशय कौतुकास्पद अशी ही नोंद आहे. वयाच्या नव्वदीतही दररोज ट्वीट करत नवीन पिढीशी त्यांनी असे आपल्याला जोडून घेतले. त्या व दिलीपकुमार, तसेच धर्मेंद्र, अमिताभ बच्चन यांचा ट्वीटरवरचा वावर कौतुकास्पद. त्यांनी १९४२ साली ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटासाठी संगीतकार सदाशिवराव नेवरेकर यांच्याकडे पहिले गाणे गायले, तेव्हा फक्त मुद्रित माध्यम होते (दुर्दैवाने ते गाणे त्या चित्रपटात समाविष्ट करण्यात आले नाही), त्याच वर्षी त्यानी ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात भूमिकाही साकारली. ‘छत्रपती शिवाजी’ (१९५२) या हिंदी चित्रपटापर्यंत त्यांनी मराठी व हिंदी मिळून नऊ चित्रपटात भूमिका साकारल्या. त्यात माझं बाळ, चिमुकला संसार, जीवन यात्रा इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी आनंदघन नावाने राम राम पाव्हणं, मोहित्यांची मंजुळा, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं, तांबडी माती या चित्रपटांना संगीत दिले.
मोबाईलची काॅलरट्यून आणि रिंगटोन यातही लता मंगेशकर कायम आणि ओटीटीवर, यू ट्यूबवरही लता मंगेशकर हुकमी. लताजींच्या गायनाने तब्बल सात दशके अनेकांचे आयुष्य समृद्ध अथवा तृप्त केले. त्यांच्या जगण्याला अर्थ, आनंद आणि कुठे आधारही दिला आहे. लता मंगेशकर हा कदापिही न संपणारा असाच एक महत्त्वाचा आणि सखोल विषय आहे.
लताजींच्या इतर आवडीनिवडीही वैशिष्ट्यपूर्ण. पेडर रोडवरील आपल्या प्रभू कुंज या निवासस्थानी अनेक वर्षे त्यांनी स्वयंपाकाची हौस कायम ठेवली. तसेच क्रिकेट पाहणे, अनेक नामवंत क्रिकेटर्सना आपल्या घरी बोलावणे, देश-विदेशात कुठेही फिरायला गेल्यावर आवडीने एकादा फोटो काढणे याची हौस कायम ठेवली. १९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडच्या लाॅर्डस मैदानावर वेस्ट इंडिज संघाचा पराभव करीत विश्वचषक जिंकला तेव्हा त्या संघाला आर्थिक पुरस्कार देण्यात यावा यासाठी लतादीदीनी अगदी आवर्जून नवी दिल्लीत एका गीत संगीत सोहळ्याचे आयोजन केले आणि त्यातून त्या संघातील प्रत्येकाला एक लाख रुपये पुरस्कार प्राप्त झाला.
आयपीएल स्पर्धेतील एक अंतिम सामना सचिन तेंडुलकरने लतादीदींसोबत प्रभू कुंजवर पहिला आणि तशा फोटोसह ट्वीटही केले.लतादीदींना अनेक पुरस्कारांनी वेळोवेळी गौरविण्यात आले याची आपणही कल्पना आहे. त्यात पद्मभूषण (१९६९) आणि भारतीय चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचा मानला जात असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराची (१९८९) विशेष दखल हवीच.
लताजी दीर्घकालीन यशस्वी, बहुस्तरीय वाटचालीनंतरही आपले मूळ व्यक्तीमत्व, स्वभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन अजिबात बदलला नाही अशा एकाद्या भारतरत्न लता मंगेशकरच. पहिल्या स्मृतिदिनानिमित्त हा छोटासा फोकस.
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com