'ही' भारतीय कंपनी करणार ब्रिटिश कंपनीसोबत 33,578 कोटींचा करार; शेअर्सवर दिसणार परिणाम!
भारतीय दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल आता ब्रिटनमध्ये मोठी डील करणार आहेत. यामुळे यूकेमध्ये कंपनीचे वर्चस्व वाढण्यास मदत होईल. मिळालेल्या माहितीनुसार, भारती एंटरप्रायझेस ब्रिटीश टेलिकॉम कंपनी बीटी समुहामधील हिस्सा खरेदी करणार आहे. हा करार सुमारे 4 अब्ज डॉलर किंवा 33,578 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा असणार आहे.
बीटी समूहाचा 24.5 टक्के हिस्सा विकत घेणार
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ब्रिटीश टेलिकॉम कंपनी अर्थात बीटी ग्रुप ही ब्रिटनची सर्वात मोठी ब्रॉडबँड आणि मोबाइल कंपनी आहे. या 4 अब्ज डॉलरच्या कराराद्वारे भारतीय अब्जाधीश सुनील भारती मित्तल यांचा समूह बीटी समूहाचा 24.5 टक्के हिस्सा विकत घेणार आहे. हा खरेदी करार पूर्ण होण्यास आणखी पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
दोन्ही कंपन्यांबाबत थोडक्यात?
भारती एंटरप्रायझेस ही भारती एअरटेल ब्रँडच्या मालकीची कंपनी आहे. एअरटेल ही कंपनी दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील जवळपास 17 देशांमध्ये सेवा कार्यरत आहे. दुसरीकडे, लंडन स्टॉक एक्सचेंजच्या मते, ब्रिटिश टेलिकॉम ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. जिचे बाजार भांडवल तब्बल 16.6 अब्ज डॉलर्स इतके आहे.
हेही वाचा : 7 शेअर मोफत, पहिल्यांदाच बोनस देणार ‘ही’ कंपनी; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड!
अल्ताईस समूह विकणार आपली हिस्सेदारी
दरम्यान, रॉयटर्सच्या अहवालानुसार अब्जाधीश पॅट्रिक द्राही यांच्या नियंत्रणाखालील गुंतवणूक गट अल्ताईस ब्रिटनच्या बीटी समूहातून बाहेर पडणार आहे. त्यासाठी ते आपली संपूर्ण हिस्सेदारी विक्री करत आहे. अल्ताईसने 2021 मध्ये ब्रिटीश टेलिकॉममध्ये हिस्सेदारी विकत घेतली. जी त्यांनी 24.5 टक्क्यांपर्यंत वाढवली. ब्रिटीश टेलिकॉममधील हीच हिस्सेदारी आता सुनील मित्तल यांच्या भारती एंटरप्रायझेसने खरेदी करण्यासाठी करार केला आहे.
शेअर्स जोरदार वाढीसह बंद
भारतीय दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेलसोबत झालेल्या कराराच्या बातमीनंतर बीटी समुहाचे शेअर्स जोरदार वाढीसह बंद झाले. बीटी ग्रुप शेअर 7.36 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय आज भारती एअरटेलच्या शेअर्सवर मोठा परिणाम दिसून आला. तथापि, सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, शेअर बाजारातील प्रचंड चढउतारांदरम्यान, भारती एअरटेलचा शेअर किंचित घसरणीसह 1,463.40 रुपयांवर बंद झाला आहे. आता या डीलचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येईल अशी अपेक्षा आहे.