7 शेअर मोफत, पहिल्यांदाच बोनस देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड!
भारतीय शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरू आहे. मात्र, अशातही शेअर बाजारातील काही स्टॉक चांगली कामगिरी करत आहेत. मल्टिबॅगर स्टॉक असलेल्या इंडो कॉटस्पिन लिमिटेडच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या सध्या उड्या पडल्या आहेत. या शेअरमध्ये 2 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली आहे. हा शेअर आज 96.69 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला आहे. त्यामुळे सध्या अनेक जण त्यावर तुटून पडले आहेत.
कंपनी 7 शेअर मोफत देणार
गेल्या एका महिन्यात हा शेअर 25 टक्क्यांपर्यंत आणि सहा महिन्यात 120 टक्क्यांपर्यंत वधारला आहे. कंपनीने नुकताच 7:10 या प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे प्रत्येक 10 शेअर मागे ही कंपनी 7 शेअर मोफत देणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कंपनीने आज शेअर बाजारात याबाबत माहिती दिली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांना कंपनीकडून 29,40,350 बोनस इक्विटी शेअर दिले जाणार आहे. मात्र, कंपनीकडून त्याबाबतची रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आलेली नाही.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : बांगलादेशातील पेचप्रसंगाचा संत्रा उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांसह निर्यातदार चिंतेत!
नेमकं काय करते कंपनी?
इंडो कॉटस्पिन लिमिटेड ही कंपनी कापडी चटाई आणि इतर जिओ टेक्सटाईलमधील प्रमुख निर्यातक, उत्पादक, व्यापार करणारी कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1955 साली झालेली आहे. स्थापनेनंतर कंपनीने पहिल्यांदा गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे.
कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती?
इंडो कॉटस्पिन लिमिटेड या कंपनीचा महसूल जून 2024 च्या तिमाहीत 5.15 टक्के घसरला, तो 3.07 कोटी रुपयांवर आला. जून 2023 च्या तिमाहीत महसूलाचा आकडा 3.24 कोटी रुपये इतका होता. जूनच्या तिमाहीत कंपनीचा फायदा 159.11 टक्के वाढला. कंपनीचा EBITDA 17.39 टक्के वाढला. त्यात गेल्या एक दोन वर्षात चढ-उतार दिसला. मात्र, १० पैकी ७ शेअर मोफत मिळणार असल्याने, कंपनीच्या गुंतवणूकदारांची लॉटरी लावली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)