इथेनॉलद्वारे सरकारने आतापर्यंत 99,014 कोटींची बचत केली, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती
भारत सरकारच्या इथेनॉल मिक्सिंग प्रोग्रामच्या मदतीने गेल्या दहा वर्षांत 17.3 दशलक्ष मेट्रिक टन कच्चे तेल कमी वापरले गेले. ज्यामुळे भारत सरकारची 99 हजार कोटींहून अधिक रुपयांची बचत झाली आहे. याशिवाय, कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जन देखील 51.9 दशलक्ष टनांनी कमी झाले आहे. असा दावा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केला आहे. सरकारचे इथेनॉल मिक्सिंगचे धोरण यशस्वी झाले असून, देशातील इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यास आणि जास्तीत जास्त वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
99,014 कोटींच्या परकीय चलनाचा खर्च वाचला
2014 या वर्षापासून इथेनॉल मिक्सिंग प्रोग्रामच्या मदतीने भारत सरकारने इंधनावरील 99,014 कोटी रुपयांच्या परकीय चलनाचा खर्च वाचवला आहे. सध्याच्या घडीला 15 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने पूर्ण केले आहे. यापुढे देशातील इथेनॉलचा वापर 2025-26 पर्यंत 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
बायोएनर्जीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत माहिती
बायोएनर्जीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ऑटोमोटिव्ह इंधनामध्ये इथेनॉलच्या वाढत्या वापरामुळे देशाला 2014 पासून 17.3 दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या खनिज तेलासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. इथेनॉल मिसळण्याचा कार्यक्रम चालला नसता तर आपल्याला इतक्या किमतीचे कच्चे तेल आयात करावे लागले असते. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
कार्बन उत्सर्जनात 51.9 दशलक्ष मेट्रिक टनांनी घट
इंधनात इथेनॉल मिश्रण करण्याच्या सरकारच्या धोरणामुळे गेल्या दशकभरात कार्बन उत्सर्जनात 51.9 दशलक्ष मेट्रिक टनांनी घट झाली आहे. ही आकडेवारी 14 जुलै 2024 पर्यंतची आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 2014 पासून इथेनॉल डिस्टिलर्सना 1.45 ट्रिलियन रुपये दिले आहेत, तर शेतकऱ्यांना 87,558 कोटी रुपये दिले आहेत. अर्थात सरकारच्या या धोरणामुळे इथेनॉल उद्योग, शेतकरी या सर्वांना देखील मोठा फायदा झाला आहे.
15,600 हून अधिक पेट्रोल पंपांवर उपलब्ध
देशात सध्याच्या घडीला 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल 15,600 हून अधिक पेट्रोल पंपांवर उपलब्ध आहे. केंद्र सरकारने मार्चमध्ये E100 इंधनही लाँन्च केले. त्यात 5 टक्के पेट्रोल आणि 1.5 टक्के सॉल्व्हेंट आणि 93-93.5 टक्के इथेनॉल असते. हे उच्च ऑक्टेन रेटिंगसह उच्च कार्यक्षमता इंजिनसाठी उत्तम आहे. यामुळे इंजिनची शक्ती वाढते.