अनिल अंबानींची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्फोटके, दारूगोळा, लहान शस्त्रे बनवणार; 10,000 कोटींची गुंतवणूक करणार!
गेल्या काही दिवसांमध्ये अनिल अंबानी यांना व्यावसायिक क्षेत्रात निराशा हाती लागली आहे. मात्र, आता अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने संरक्षण क्षेत्रात आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स डिफेन्स लिमिटेड ही कंपनी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे स्फोटके, दारुगोळा आणि लहान शस्त्रे तयार करण्यासाठी सर्वात मोठा एकात्मिक प्रकल्प उभारणार आहे. याबाबत कंपनीने अधिकृतरित्या घोषणा केली आहे.
काय म्हटलंय कंपनीने शेअर बाजारात माहिती देताना
स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने माहिती देताना सांगितले आहे की, महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील वाटड औद्योगिक क्षेत्रात कंपनीला धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी उभारण्यासाठी 1000 एकर जमीन देण्यात आली आहे. त्याच धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटीमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रवर्तित कंपनी रिलायन्स डिफेन्स लिमिटेड स्फोटके, दारुगोळा आणि लहान शस्त्रे तयार करण्यासाठी प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे आता अनिल अंबानी हे संरक्षण क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे.
10 वर्षांत 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक
दारूगोळा श्रेणीमध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या कॅलिबर आणि टर्मिनल मार्गदर्शित युद्धसामग्री समाविष्ट आहे. स्मॉल आर्म्स पोर्टफोलिओमध्ये नागरी आणि लष्करी दोन्ही निर्यात बाजारांना लक्ष केंद्रित केले जाईल. येत्या 10 वर्षांत या प्रकल्पात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. याशिवाय रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितले की, या प्रकल्पासाठी जगातील सहा आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसह संभाव्य संयुक्त उपक्रम प्रस्तावित आहे.
1000 कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात
नागपूर येथे रिलायन्सचा मिहान येथे फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन आणि थेल्स या दोन आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसोबत यशस्वी संयुक्त उपक्रम आहे. Dassault Reliance Aerospace Limited (DRAL) आणि Thales Reliance Defence Systems (TRDS) त्यांच्या उत्पादनातील 100 टक्के निर्यात करतात. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने सांगितले आहे की, त्यांच्या उपकंपनीद्वारे कंपनीने 1000 कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात केली आहेत.
काय आहे रिलायन्सच्या शेअरची स्थिती
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या उपकंपन्या जय आर्मामेंट्स लिमिटेड आणि रिलायन्स डिफेन्स लिमिटेड यांना भारत सरकारकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तयार करण्याचा परवाना आधीच मिळाला आहे. आज शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने ही माहिती दिली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर ५ टक्क्यांच्या घसरणीसह २५४.५५ रुपयांवर बंद झाला आहे.