
गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरु आहे. त्यामुळे ही पडझड कधी थांबणार याची चिंता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना होती. आज आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सकाळी बाजार खुला होताच बाजारामध्ये जोरदार घसरण झाली.मात्र दिवसभराच्या व्यवहारात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी शेअर्सची खरेदी केल्यामुळे बाजाराने आपले सुरुवातीचे नुकसान भरून काढले. ऑटो, बँकिंग आणि फार्मा शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे ही रिकव्हरी बाजारात आली आहे. दिवसातील खालच्या पातळीवरून बीएसई सेन्सेक्सने तब्बल 1000 अंकांची आणि एनएसई निफ्टीने 300 अंकांची झेप घेतली आहे. आजच्या व्यवहारानतर BSE सेन्सेक्स 218 अंकांच्या तेजीसह 81,224 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 113 अंकांच्या तेजीसह 24,854 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारातील टॉप गेनर्स आणि लूजर्स
सेन्सेक्समधील शीर्ष 30 शेअर्सपैकी 19 शेअर हे वाढीसह आणि इतर 11 शेअर तोट्यासह बंद झाले. निफ्टी 50 चा विचार केला तर शेअर्सपैकी 33 वाढीसह तर 17 शेअर घसरणीसह बंद झाले. दिवसातील टॉप गेनर्समध्ये ॲक्सिस बँक 5.75 टक्के, विप्रो 3.59 टक्के, आयशर मोटर्स 2.98.टक्के, आयसीआयसीआय बँक 2.90 टक्के, श्रीराम फायनान्स 2.80.टक्के, हिंदाल्को 2.50 टक्के, एचडीएफसी लाइफ 2.40 टक्के वाढीसह बंद झाले. टॉप लूजर्समध्ये इन्फोसिस 4.22 टक्के, ब्रिटानिया 1.98 टक्के, एशियन पेंट्स 1.87 टक्के, नेस्ले 1.21 टक्के, टेक महिंद्रा 0.82 टक्के, बजाज ऑटो 0.77 टक्के तोट्यासह बंद झाले.
बॅंकिंग क्षेत्रामध्ये कमालीची तेजी तर आयटी क्षेत्रात प्रचंड घसरण
शेअर बाजारात झालेली आजची वाढ ही बँकिंग स्टॉक्समुळे झाली आहे. त्यामुळे निफ्टी बँक 805 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे. तसेच फार्मा सेक्टर, ऑटो सेक्टर, मेटल, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर इत्यादी सेक्टरचे शेअर्स तेजीसह बंद झाले. घसरण झालेल्या क्षेत्रांमध्ये सर्वात मोठी घसरण ही आयटीच्या शेअरमध्ये झाली आहे. निफ्टीचा आयटी निर्देशांक तब्बल 627 अंकांनी घसरून बंद झाला आहे. तसेच तेल आणि वायू, एफएमसीजी शेअर्समध्येही मोठ्या प्रमाणामध्ये घसरण दिसून आली आहे. सकाळच्या व्यवहारात मोठ्या नुकसानासह व्यवहार करणाऱ्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये व्यवहाराअंती तेजी परतली. शेअरबाजारातील तेजीमुळे या आठवड्याचा शेवट चांगला झाला आहे त्यामुळे गुंतवणूदारांसाठी पुढील आठवडा आशादायी असण्याची चिन्हे आहेत .