
देशातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (ईपीएफओ) आपल्या नियमांमध्ये मोठे बदल कारण्यात आले आहेत. ज्यानुसार आता ईपीएफओकडून कोरोनाच्या काळात सुरू झालेली कोविड ॲडव्हान्स सुविधा बंद करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली होती. ती आता बंद करण्यात आली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात मार्च 2020 लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या घडीला कोरोना महामारी नसल्यामुळे ही सेवा तात्काळ प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम सूट देण्यात आलेल्या ट्रस्टसह सर्व आस्थापनांना लागू असणार आहे.
दोन कोटी लोकांनी घेतला लाभ
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या दोन कोटींहून अधिक ग्राहकांनी कोरोना काळात आगाऊ पैसे काढण्याच्या सुविधेचा लाभ घेतला होता. 2023 पर्यंत या सुविधेद्वारे जवळपास आगाऊ म्हणून 48,075.75 कोटी रुपये काढण्यात आले. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या मसुदा वार्षिक अहवाल 2022-23 नुसार, ईपीएफओने 2020-21 मध्ये 69.2 लाख ग्राहकांना 17,106.17 कोटी रुपये वितरित केले होते. तर 2021-22 मध्ये, 91.6 लाख ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आणि ज्यांनी एकूण 19,126.29 लाख कोटी रुपये आगाऊ काढले आहेत. त्याचप्रमाणे, 2022-23 मध्ये, 62 लाख ग्राहकांनी त्यांच्या पीएफ खात्यातून 11,843.23 कोटी रुपये काढले आहे.
कोणत्या बाबींसाठी काढले जाऊ शकतात पैसे?
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून आगाऊ पैसे अनेक बाबींसाठी काढले जाऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने घर बांधणी-खरेदी, कुटुंबातील आरोग्य समस्या, कंपनी बंद होणे, कुटुंबातील लग्न, मुलांचे शिक्षण आदी बाबींचा समावेश आहे. याशिवाय जर तुम्ही 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असाल, कंपनी 15 दिवसांपेक्षा जास्त काळ बंद राहणे आदी कारणांमुळे देखील आगाऊ रक्कम काढली जाऊ शकते.