घर बांधणे महागले! देशातील सळईंच्या किंंमतीत मोठी वाढ, सर्वसामान्यांना खिशाला आणखी झळ बसणार!
स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आजच्या काळात घर घेणे तितकेसे सोपे नाही. घर घेण्यासाठी भरपूर पैसे खर्च करावे लागतात. यासाठी अनेक जण मोठे कष्ट घेत असतात. त्यामुळे आपला घर बांधणी बांधकाम खर्च कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. विशेष म्हणजे अनेकजण घर बांधण्याचे नियोजन करताना बांधकाम साहित्याच्या किमती कमी होण्याची वाट पाहत असतात. पावसाळी हंगामात देशभरात सळईच्या किमतींत मोठी घसरण झाली असताना, आता महिनाभरात त्यांचे दर पुन्हा झपाट्याने वाढले आहेत.
महिन्याभरात सळईच्या किंमतीत 1500 ते 2000 रुपयांनी वाढ
सध्याच्या घडीला राजधानी दिल्ली ते गोव्याप्रर्यंत सळईचे भाव वाढले आहेत. एवढेच नाही तर सिमेंट आणि विटांचे भाव देखील वाढले आहेत. यावर्षी देशभरात मुसळधार पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सळईच्या किंमती झपाट्याने घसरताना दिसल्या आहे. मात्र, ही घसरण महिनाभरच राहिली आहे. सध्याच्या घडीला घर बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सळईच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये अवघ्या एका महिन्यात सळईच्या किंमतीत 1500 ते 2000 रुपये प्रति टन वाढ झाली आहे. अर्थात आता सर्वसामान्यांना खिशाला आणखी झळ बसणार आहे.
सळ्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ
सिमेंट-विटांप्रमाणेच सळई देखील घराच्या बांधकामात वापरली जाणारी सर्वात महागडी बांधकाम सामग्री आहे. सळईच्या किंमतीत बदल झाल्यास, एकुण बांधकाम खर्चात चढ-उतार होत असतो. यामुळेच घर बांधण्याचा विचार करताना, लोक सळई स्वस्त होण्याची वाट पाहत असतात. साधारणपणे पावसाळ्यात दर वेळी सळईच्या किंमती घसरलेल्या असतात. मात्र, यावेळी सध्याच्या घडीला पावसाळा सुरू असूनही, लोखंडी सळ्यांच्या किमती मात्र सातत्याने वाढत आहेत.
सळईच्या सध्याच्या व महिनाभरापुर्वीच्या किंमती (18 टक्के जीएसटी वगळता)
– जालना (महाराष्ट्र) – 44,600 रुपये प्रति टन (27 ऑगस्ट 2024)
– 47,300 रुपये प्रति टन (28 सप्टेंबर 2024)
– दिल्ली – 45,500 रुपये प्रति टन (27 ऑगस्ट 2024)
– 47,300 रुपये प्रति टन (28 सप्टेंबर 2024)
– जयपूर – 44,400 रुपये प्रति टन (27 ऑगस्ट 2024)
– 45,900 रुपये प्रति टन (28 सप्टेंबर 2024)
– कोलकाता – 41,800 रुपये प्रति टन (27 ऑगस्ट 2024)
– 43,500 रुपये प्रति टन (28 सप्टेंबर 2024)
– इंदोर – 46,100 रुपये प्रति टन (27 ऑगस्ट 2024)
– 48,500 रुपये प्रति टन (28 सप्टेंबर 2024)
अशा तपासा तुमच्या शहरातील सळईच्या किंमती
तुम्ही तुमच्या शहरातील लोखंडी सळ्यांच्या नवीनतम किंमती Ironmart (ayronmart.com) या वेबसाइटवर पाहू शकतात. सळईच्या किंमती प्रति टनाच्या आधारे उद्धृत केल्या जातात. सरकारने निश्चित केलेल्या 18 टक्के दराने जीएसटी स्वतंत्रपणे लागू केला जातो.