फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकूण संपत्ती 206.2 अब्ज डॉलर!
फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत यावर्षी प्रचंड वाढ झाली आहे. अलीकडेच त्यांनी प्रथमच 200 अब्ज डॉलर्स संपत्तीचा पल्ला गाठला आहे. आता त्यांनी आणखी एक विक्रम रचला असून, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांची एकूण संपत्ती २०६.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जेफ बेझोस यांना मागे टाकून, त्यांनी हे स्थान मिळवले आहे. आता केवळ टेस्लाचे मालक एलॉन मस्क हे त्यांच्या पुढे आहेत.
यावर्षी मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत ७८ अब्ज डॉलरची वाढ
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या अहवालानुसार, एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती सध्या 256 अब्ज डॉलर इतकी आहे. मार्क झुकेरबर्ग 206 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आणि ॲमेझॉनचे माजी सीईओ जेफ बेझोस 205 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत. आता मार्क झुकरबर्ग आणि एलॉन मस्क यांच्यात केवळ ५० अब्ज डॉलर्सचे अंतर उरले आहे. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गसाठी 2024 हे वर्ष खूप चांगले आहे. त्यांच्या संपत्तीत आतापर्यंत ७८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. याशिवाय तो श्रीमंतांच्या यादीत 4 स्थानांनी वर पोहोचला आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
मेटा प्लॅटफॉर्मच्या स्टॉकमध्ये 70 टक्क्यांनी वाढ
मेटा प्लॅटफॉर्म्समध्ये मार्क झुकरबर्ग यांची सुमारे 13 टक्के भागीदारी आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत येतात. यावर्षी त्यांनी जगातील 500 श्रीमंत लोकांमध्ये सर्वाधिक पैसे कमावले आहेत. विशेष म्हणजे मेटा प्लॅटफॉर्मचे शेअर्स यावर्षी जवळपास 70 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे कंपनीचा शेअर चांगली कामगिरी करत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या प्रचंड वाढीमुळे, मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीतही झपाट्याने वाढ झाली आहे.