गौतम अदानींचा विक्रम! काही तासांत कमावले 73 हजार कोटी रुपये, एकूण संपत्तीतही झालीये भरघोस वाढ!
अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत 50, 60 किंवा 70 हजार कोटी रुपयांची नव्हे तर 73 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे अदानींच्या एकूण संपत्तीत देखील मोठी वाढ झाली आहे. सध्या अदानींची एकूण संपत्ती किती आहे, याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत.
पुन्हा टॉप 20 अब्जाधीशांच्या यादीत समावेश
एकीकडे इलॉन मस्क, जेफ बेझोस, लॅरी एलिसन, मायकेल डेल यांच्या संपत्तीत शुक्रवारी घट झाली आहे. दुसरीकडे, अमेरिकेत सुरू असलेल्या लाचखोरीदरम्यान गौतम अदानी यांनी अब्जाधीशांच्या जगात खळबळ उडवून दिली आहे. शुक्रवारी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत 73 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर ते पुन्हा एकदा जगातील टॉप 20 अब्जाधीशांच्या यादीत आले आहेत.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत वाढ
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, जगातील 500 अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत 8.64 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. याचा अर्थ गौतम अदानी यांच्या संपत्तीत 73 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली होती. 21 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गौतम अदानी यांच्या संपत्तीत 18.7 अब्ज डॉलरची घट झाली आहे. सध्या गौतम अदानी यांची संपत्ती 66.8 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
हे देखील वाचा – शाहरुख, सलमान की अमिताभ? कोणता अभिनेता भरतो सर्वाधिक कर, वाचा… सविस्तर!
कितीये अदानी यांची एकूण नेट वर्थ?
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 75.5 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या वाढीनंतर गौतम अदानी पुन्हा एकदा जगातील टॉप 20 अब्जाधीशांमध्ये आले आहेत. मात्र, चालू वर्षात त्यांच्या संपत्तीत 8.83 अब्ज डॉलरची घट झाली आहे. 6 नोव्हेंबर रोजी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 97.2 अब्ज डॉलर होती. ज्यामध्ये आत्तापर्यंत 21.7 अब्ज डॉलरची घट झाली आहे. 3 जून रोजी, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 122 अब्ज डॉलर होती. ज्यामध्ये आतापर्यंत 46.5 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)