
मुंबईत स्वस्तात घर घ्यायचंय... सिडकोने 902 घरांसाठी काढलीये लॉटरी, आत्ताच करा अर्ज
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित म्हणजेच सिडकोकडून नवी मुंबईतील 902 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. नवी मुंबईत घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील सिडकोच्या कळंबोली, खारघर आणि घणसोली येथील घरांसह व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तूविहार सेलीब्रेशन येथील एकूण सिडकोकडून 902 घरांसाठी सिडकोकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर या योजनेच्या सोडतीसाठी आज (ता.२७) दुपारी बारा वाजल्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
आजपासून अर्जप्रक्रिया सुरु
सिडकोच्या वेबसाईटवर या 902 घरांसाठी नोंदणी करता येणार आहे. या घरांसाठी अर्ज सादर करण्यासाठी सिडकोच्या वेबसाईटवर 27 ऑगस्ट म्हणजेच आज दुपारपासून सुरुवात झाली आहे. सिडकोची ही घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, खुला प्रवर्ग, मध्यम उत्पन्न गटांसाठी असतील. कळंबोली, खारघर आणि घणसोली येथे एकूण 213 घरे आहेत. यापैकी 175 सर्वसामान्य प्रवर्गासाठी तर 38 घरे आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी आहेत. खारघरमध्ये सिडकोचे सप्नपूर्ती आणि वास्तूविहार सेलीब्रेशन हे प्रकल्प देखील आहेत. तिथे 689 घरे उपलब्ध आहेत.
हे आहे योजनेचे वेळापत्रक
– ऑनलाईन अर्ज नोंदणी : 27 ऑगस्ट 2024 दुपारी 12 वाजता नोंदणी सुरु ते 25 सप्टेंबरपर्यंत
– सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात : 27 ऑगस्ट 2024 दुपारी 12 वाजता नोंदणी सुरु ते 26 सप्टेंबरपर्यंत
– ऑनलाईन शुल्क भरणा : 27 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर
– संगणकीय सोडत : 10 ऑक्टोबर रोजी होणार
किती आहे घराची किंमत
सिडकोने काढलेल्या या 902 घरांच्या लॉटरीसाठी कमीत कमी 26 लाखांपासून 2 कोटी रुपयांपर्यंतची किंमत असणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध आहेत. सिडकोने अधिकृत वेबसाईटवर अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. सिडकोच्या या योजनेची सोडत 10 ऑक्टोबरला होणार आहे.
काय आहेत या घरांची वैशिष्टे
– ही सोडत तब्बल ९०२ घरांसाठी असणार आहे.
– रस्ते, रेल्वे, मेट्रोद्वारे या घरांची उत्तम कनेक्टिव्हिटी आहे.
– आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण अशी गृहसंकुले आहेत.
– शाळा, महाविद्यालय, रुग्णालय इ. मूलभूत सुविधांनी परिपूर्ण परिसर आहे.
– विकसित नोडमध्ये व मोक्याच्या ठिकाणी असणारी ही गृहसंकुले आहेत.
– याशिवाय घणसोली, खारघर व कळंबोली नोडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या सदनिकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २.५० लाखांचे अनुदान देखील उपलब्ध असणार आहे.