एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाच्या जेवणात झुरळ; कंपनीने माफी मागत कारवाईचे दिले आश्वासन!
प्रवासी महागडे तिकिट काढून विमान कंपन्यांच्या माध्यमातून प्रवास करत असतात. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांची असते. मात्र, अनेकवेळा अशा घटना घडतात. ज्यानंतर प्रवाशांना पैसे फुकट गेल्याचे वाटू लागते. असाच काहीसा प्रकार एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एका प्रवाशासोबत घडला आहे. त्याने आरोप केला आहे की, एअरलाइनने त्याला दिलेल्या जेवणात झुरळ सापडले होते. ही घटना सोशल मीडियावर आल्यानंतर एअर इंडियाने प्रवाशाची माफी मागितली असून, कारवाईचे आश्वासनही दिले आहे.
ऑम्लेट खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा
एअर इंडियाच्या एका आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये सुयशा सावंतला ऑम्लेट देण्यात आले होते. त्यात एक झुरळ आढळून आले आहे. यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या दोन वर्षांच्या मुलाने हे ऑम्लेट खाल्ले आहे. झुरळाचा अर्धा भाग खाल्ल्यानंतर आम्हाला त्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्याचा व्हिडिओ आणि फोटोही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. यासोबतच एअर इंडिया, डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनाही टॅग करण्यात आले आहे.
Found a cockroach in the omelette served to me on the @airindia flight from Delhi to New York. My 2 year old finished more than half of it with me when we found this. Suffered from food poisoning as a result. @DGCAIndia @RamMNK pic.twitter.com/1Eyc3wt3Xw
— Suyesha Savant (@suyeshasavant) September 28, 2024
काय म्हटलंय कंपनीने आपल्या निवेदनात
ही घटना उघडकीस येताच एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला ग्राहकांची काळजी आहे. आम्ही आमच्या खानपान सेवा प्रदात्याला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. ही घटना 17 सप्टेंबर रोजी घडली आहे. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांबद्दल जागरूक राहतो. भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नाही याची काळजी घेतली जाईल. असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. एअर इंडियामधील खाद्यपदार्थ नामांकित संस्थांद्वारे पुरवले जातात. जे अनेक जागतिक विमान कंपन्यांना अन्न पुरवत आहेत. तसेच एअर इंडियाकडून खाद्यपदार्थांची पुरेशी तपासणी केली जाते.