तरुणांसाठी आनंदाची बातमी..! सीएसआर निधी पीएम इंटर्नशिप योजनेसाठी खर्च केला जाणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
पीएम इंटर्नशिप योजनेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर आता सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या त्यांचे सीएसआर निधीचे पैसे खर्च करू शकणार आहे. यासाठी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी चालू आर्थिक वर्षासाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. आता या कंपन्यांच्या सीएसआरमध्ये पंतप्रधान इंटर्नशिप योजना देखील सामान्य विषय किंवा थीम म्हणून समाविष्ट केली जाणार आहे.
कंपन्या सीएसआर निधीच्या 60 टक्के खर्च करू शकतील
सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या दरवर्षी त्यांची सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी थीम किंवा विषय ठरवतात. त्यांना त्यांच्या सीएसआर निधीपैकी 60 टक्के रक्कम ही या थीमवर खर्च करावी लागते. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सीएसआरसाठी ‘आरोग्य आणि पोषण’ मध्ये पीएम इंटर्नशिप योजना समाविष्ट केली आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या या आर्थिक वर्षात त्यांच्या सीएसआर निधीपैकी 60 टक्के रक्कम ही या गोष्टींवर खर्च करू शकणार आहे.
हे देखील वाचा – मुंबईत 10-15 लाख कमावणाराही गरीब, नोकरदारांच्या पगाराचे पैसे कोण खातंय… तरी कोण?
यावर्षी १.२५ लाख तरुणांना दिली जाणार इंटर्नशिप
केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने या महिन्याच्या सुरुवातीला इंटर्नशिप योजनेअंतर्गत कंपन्यांची तसेच इंटर्नची नोंदणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 5 वर्षात एक कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. या पायलट प्रोजेक्टअंतर्गत 12 महिन्यांची इंटर्नशिप 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मार्च 2025 ला संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात 1.25 लाख तरुणांना त्याअंतर्गत आणण्याचे लक्ष्य असल्याचेही सांगितले जात आहे.
अर्थसंकल्पात केली होती योजनेची घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पीएम इंटर्नशिप योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत टॉप ५०० कंपन्या २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देतील. याशिवाय त्यांना जीवन विमाही दिला जाणार आहे. एका वर्षासाठी 5,000 रुपये मासिक आर्थिक मदतीव्यतिरिक्त, इंटर्नला 6,000 रुपये एकरकमी अनुदान दिले जाणार आहे. मासिक साहाय्यामध्ये, 4,500 रुपये सरकार आणि 500 रुपये कंपनी आपल्या सीएसआर फंडातून दिली जाणार आहे.
तरुणांना नोंदणीसाठी ५ दिवसांचा अवधी
तरुणांना या योजनेसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. 26 ऑक्टोबर रोजी युवकांची निवड होणार आहे. यानंतर 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत कंपन्या त्यांच्यासाठी काम करण्यासाठी तरुणांची निवड करतील. ऑफर स्वीकारण्यासाठी तरुणांना 8 ते 15 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात येणार आहे. उमेदवाराला जास्तीत जास्त तीन ऑफर दिल्या जातील. असे सांगितले जात आहे.