मुंबईत 10-15 लाख कमावणाराही गरीब, नोकरदारांच्या पगाराचे पैसे कोण खातंय... तरी कोण?
मुंबईला स्वप्नांची नगरी म्हणतात. या मायानगरीत देशभरातील बडे उद्योगपती आणि सिनेतारक थाटामाटात राहतात. या ठिकाणी घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने सामान्य माणसाला त्या ठिकाणी राहणे अवघड झाले आहे. मुंबईत घर घेणे तर विसरा, त्या ठिकाणी भाड्याने राहणे ही देखील मोठी गोष्ट आहे. घरभाड्याच्या बाबतीत देशातील सर्वात महागड्या शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक लागतो.
काय सांगतो अहवाल
रिअल इस्टेट डेव्हलपर्सची सर्वोच्च संस्था असलेल्या क्रेडाई-एमसीएचआयच्या वार्षिक अहवालानुसार, मुंबईतील घरांसाठी सरासरी वार्षिक भाडे 1 बीएचके अपार्टमेंटसाठी 5.18 लाख रुपयांपर्यंत असू शकते. एका चांगल्या कंपनीतील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक ५ लाख रुपये हे वार्षिक पॅकेज आहे. अहवालात म्हटले आहे की, मुंबईतील वाढत्या भाड्याच्या किमतींमुळे नोकरदार आणि हुशार लोकांचे स्थलांतर होऊ शकते. कारण या व्यावसायिकांना बचत आणि आर्थिक स्थैर्यासाठी परवडणाऱ्या शहरांमध्ये राहण्यास भाग पडू शकते.
मुंबईच्या तुलनेत बंगळुरू आणि दिल्ली-एनसीआरमधील 1 बीएचके अपार्टमेंटसाठी सरासरी वार्षिक भाड्याची किंमत जवळपास निम्मी आहे. अनुक्रमे 2.32 लाख रुपये आणि 2.29 लाख रुपये आहे. तर बंगळुरू आणि दिल्लीतील कर्मचाऱ्यांचे सरासरी वार्षिक वेतन अनुक्रमे 5.27 लाख रुपये आणि 4.29 लाख रुपये आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
(फोटो सौजन्य – istock)
मुंबईत राहणे खूप महागडे
अहवालानुसार, नोकरी करणाऱ्यांना मुंबईत राहणे खूप महागडे आहे. मध्यम-स्तरीय कर्मचारी, जे सहसा 2 बीएचके अपार्टमेंट भाड्याने घेतात, ते वार्षिक सरासरी 15.07 लाख रुपये कमवतात आणि मुंबईत भाड्यावर दरवर्षी सरासरी 7.5 लाख रुपये खर्च करतात. दुसरीकडे, बंगळुरूमध्ये 16.45 लाख रुपये वार्षिक पगार मिळवणारा आणि 2 बीएचकेमध्ये राहणारा मध्यम-स्तरीय कर्मचारी भाड्यावर वार्षिक 3.90 लाख रुपये खर्च करतो. अहवालानुसार, दिल्ली-एनसीआरमधील मध्यम-स्तरीय कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन 14.07 लाख रुपये आहे आणि त्यांना सरासरी वार्षिक भाडे 3.55 लाख रुपये आहे.
अहवालानुसार, मुंबईतील वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांचे सरासरी वार्षिक वेतन 33.95 लाख रुपये इतके आहे. असे मानले जाते की, ते 3 बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतात आणि भाड्यावर दरवर्षी सरासरी 14.05 लाख रुपये खर्च करतात.
प्रॉपर्टीच्या बाबतीतही मुंबई सर्वात महाग
ताज्या अहवालानुसार, निवासी रिअल इस्टेट प्रकल्पांसाठी मुंबईचा प्रीमियम दिल्ली-एनसीआरपेक्षा 25 पट जास्त आहे. हैदराबादपेक्षा 50 पट जास्त, बंगळुरूपेक्षा 47 पट जास्त आणि चेन्नई आणि पुण्यापेक्षा 9 पट जास्त आहे. मुंबईतील विकासक सरासरी 1 चौ.मी. क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रीमियम म्हणून मंजूरी खर्च म्हणून 54,221 भरतो. दिल्ली एनसीआरमध्ये, किंमत फक्त 2,166 रुपये आहे, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये ती 1,071 रुपये आणि 5,466 रुपयांपर्यंत आहे.