देशात वेगाने वाढतोय क्रेडिट कार्डचा वापर; 'या' बॅंकेचे खातेधारक करतायेत सर्वाधिक वापर
भारतात क्रेडिट कार्डचा वापर झपाट्याने वाढत आहे. क्रेडिट कार्डद्वारे उपलब्ध असलेल्या कॅशबॅक आणि ऑफरचा लाभ घेण्यासाठी लोक त्याद्वारे अधिकाधिक पेमेंट करत असल्याचे समोर आले आहे. अशातच आता जुलै महिन्यामध्ये लोकांनी क्रेडिट कार्डद्वारे सुमारे 19 टक्के अधिक पैसे खर्च केले आहे. देशभरातील नागरिकांनी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे १.७ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, जुलै 2024 या महिन्यामध्ये वार्षिक आधारावर क्रेडिट कार्डचा वापर 39 टक्क्यांनी वाढून, 38.4 कोटींवर पोहोचला आहे.
नागरिकांचा क्रेडिट कार्डवरील विश्वास घट्ट
एसबीआय सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, देशातील नागरिकांचा क्रेडिट कार्डवरील विश्वास घट्ट झाला आहे. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणे सोपे झाले आहे. वार्षिक आधारावर, जुलै 2024 मध्ये केवळ व्यवहारच वाढले नाहीत. तर त्याद्वारे खर्च होणारी रक्कमही वाढली आहे. या अहवालात दावा करण्यात आला आहे की, या काळात सर्वाधिक आर्थिक व्यवहार हे एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे झाले आहेत.
(फोटो सौजन्य – istock)
सर्वाधिक आर्थिक व्यवहार एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे
एचडीएफसीच्या बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी जुलै 2024 मध्ये 9.9 कोटी व्यवहार केले आहेत. त्यानंतर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक दुसऱ्या स्थानावर आहे. या बँकेच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांनी ७.१ कोटी व्यवहार केले आहेत. तर एसबीआय बॅंकेने तिसरे स्थान पटकावले असून, ग्राहकांनी एसबीआय बॅंकेच्या क्रेडिट कार्डद्वारे 6.3 कोटीचे व्यवहार केले आहेत.
हे देखील वाचा – मुंबईने पुन्हा घातली आकाशाला गवसणी; जगातील उंच इमारतींच्या यादीत 15 व्या क्रमांकावर!
युपीआयच्या यशानंतरही क्रेडिट कार्डचे महत्व अधोरेखीत
एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांनी क्रेडिट कार्डद्वारे जुलै महिन्यामध्ये 44,369 कोटी रुपये खर्च केले. तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेच्या खातेधारकांनी क्रेडिट कार्डद्वारे जुलै महिन्यामध्ये 34,566 कोटी रुपये आणि एसबीआय बॅंकेच्या क्रेडिट कार्डद्वारे 26,878 कोटी रुपये खर्च केले आहेत. जुलै 2024 मध्ये सरासरी व्यवहाराचे आर्थिक मूल्य देखील महिन्याच्या आधारावर 1.4 टक्क्यांनी वाढले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, काही काळानंतर लोक पुन्हा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खर्च करू लागले आहेत. त्यामुळे युपीआय यशानंतरही भारतात क्रेडिट कार्डचे महत्व दिसून येत आहे.