मार्च 2022 नंतर इंडिगोच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण, शेअर 13 टक्क्यांनी आपटला! वाचा... सविस्तर
देशातील सर्वात मोठी खासगी विमान वाहतूक कंपनी इंडिगोच्या स्टॉकसाठी सोमवारचा दिवस (ता.28) खूप निराशाजनक राहिला आहे. आज दिवसभराच्या व्यवहारात इंडिगोचा शेअर 13.42 टक्क्यांनी घसरला. अर्थात या शेअरची 3780 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. मार्च 2022 नंतर प्रथमच इंडिगोच्या स्टॉकमध्ये इतकी मोठी घसरण दिसून आली आहे. आज शेअर बाजार बंद होताना, व्यवहाराअंती शेअर 8.03 टक्क्यांच्या वाढीसह 4015.45 रुपयांवर बंद झाला आहे.
दुसऱ्या तिमाहीत निराशाजनक कामगिरी
इंडिगोने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत अत्यंत निराशाजनक आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. इंडिगोला दुसऱ्या तिमाहीत इंधन खर्चात झालेली वाढ आणि जमिनीशी संबंधित खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे तोटा सहन करावा लागला आहे. इंडिगोला दुसऱ्या तिमाहीत 987 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तथापि, एअरलाइन्सच्या महसुलात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आणि ती 16,969 कोटी रुपये होती. जी गेल्या वर्षी याच तिमाहीत 14,943 कोटी रुपये होती. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी निकालांवर सांगितले आहे की, दुसऱ्या तिमाहीत निकाल नेहमीच कमजोर असतात. परंतु ग्राउंडिंग आणि इंधनावरील वाढीव खर्चाचा परिणाम यावेळी परिणामांमध्ये दिसून आला आहे.
हे देखील वाचा – बाबा रामदेव यांच्या पतंजलीने जाहीर केला लाभांश; प्रत्येक शेअरवर मिळणार आठ रुपये!
घसरणीनंतर शेअर लोअर सर्किटला
आज शेअर बाजारात इंडिगोचा शेअर 4366 रुपयांच्या आधीच्या बंद किमतीच्या तुलनेत 4200 रुपयांवर उघडला आहे. स्टॉकच्या तीव्र विक्रीमुळे, तो 10 टक्के घसरल्यानंतर लोअर सर्किटला लागला. सर्किट उघडल्यानंतर शेअर आणखी घसरला आणि 13.40 टक्क्यांहून अधिक घसरून, 3780 रुपयांपर्यंत खाली आला आहे. याशिवाय स्टॉकमधील खरेदी खालच्या स्तरावरून परतली आणि 4000 रुपयांच्या वर येण्यात यशस्वी झाली आहे. शेअर 350 रुपयांच्या किंवा 8.03 टक्क्यांच्या घसरणीसह 4015 रुपयांवर बंद झाला आहे. इंटरग्लोब एव्हिएशनचे बाजार भांडवल 1,55,105 कोटी रुपये झाले आहे.
तज्ञ काय सल्ला देतात
इंडिगोच्या शेअर्समध्ये घसरण होऊनही, कोटक सिक्युरिटीजने शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु लक्ष्य किंमत 5400 रुपयांवरून 5200 रुपये केली आहे. याशिवाय, नुवामाने स्टॉक कमी केला आहे आणि लक्ष्य किंमत 4415 रुपये केली आहे. दरम्यान, इंडिगोच्या शेअर्संनी 2024 मध्ये 35 टक्के आणि दोन वर्षांत 127 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)