इन्फोसिसच्या अडचणीत वाढ; कंपनीला मिळाली 32,000 कोटींच्या जीएसटी चोरीची नोटीस!
देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिस टेक्नॉलॉजीज् लिमिटेडने जीएसटी चोरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने ३० जुलै २०२४ रोजी जीएसटी मागणीसाठी इन्फोसिसला अधिकृतरित्या एक नोटीस पाठवली आहे. इन्फोसिस कंपनीने जुलै 2017 ते 2021-22 या संपूर्ण आर्थिक वर्षांमध्ये जीएसटी भरलेला नाही. विशेष म्हणजे हा जीएसटी तब्बल 32,000 कोटी रुपये इतका आहे, असे नोटिशीत जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने म्हटले आहे.
32,000 कोटींच्या जीएसटी चोरीची नोटीस
दरम्यान, जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने नोटिशीत म्हटल्याप्रमाणे, इन्फोसिसने सेवा प्राप्तकर्ता म्हणून, सेवांच्या आयातीवर आयजीएसटी न भरल्याबद्दल ही नोटीस कंपनीला पाठवण्यात आली आहे. देशातील एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तसमूहाने याबाबत वृत्त प्रसारित केले आहे. ज्यात इन्फोसिस कंपनीला 32,000 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीची नोटीस मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : ८ वा वेतन आयोग केव्हा लागू होणार? केंद्र सरकारने संसदेत स्पष्टच सांगितले… वाचा सविस्तर!
जीएसटी भरण्यास इन्फोसिस जबाबदार
विशेष म्हणजे कंपनीने बाहेरील देशांत आपल्या शाखा उघडल्या आहेत. कंपनीने परदेशातील शाखा कार्यालयांकडून मिळालेल्या सेवांच्या पुरवठ्याच्या बदल्यात शाखा कार्यालयांना परदेशी शाखा खर्च म्हणून पैसे दिले आहेत. त्यामुळे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत भारताबाहेरील शाखांमधून पुरवठा प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस लिमिटेड जीएसटी भरण्यास जबाबदार आहे. असेही जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने आपल्या नोटिशीत म्हटले आहे.
इन्फोसिसकडून याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया नाही
संबंधित इंग्रजी वृत्तसमूहाने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, इन्फोसिसला डीजीजीआयकडून तपासणीसाठी नोटीस मिळाली आहे. परंतु कंपनीने राज्य आणि केंद्राच्या जीएसटी कायद्यांचे पूर्णपणे पालन केले आहे, असा विश्वास कंपनीला आहे. मात्र, इन्फोसिसकडून याप्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता इन्फोसिस या कंपनीला हे जीएसटी चोरीचे प्रकरण चांगलेच महागात पडणार आहे.