

लेखक, निर्मात्यांसाठी सुवर्णसंधी!
NFDC आणि Sony Pictures ची मोठी भागीदारी
'वेव्हज बझार'द्वारे 5 भाषांमध्ये सादर करता येणार नवीन कथा
NFDC Sony Pictures Networks India Partnership : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएनआय) यांनी आज गोव्यातील ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (आयएफएफआय) 'वेव्ह्स बाजार × एसपीएनआय आशय निर्माता सादरीकरण उपक्रम' सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली.
या उपक्रमांतर्गत देशभरातील लेखक, निर्माते आणि निर्मिती संस्थांना हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू आणि बांगला भाषांमध्ये एसपीएनआयकडे मूळ काल्पनिक आणि अ-काल्पनिक संकल्पना सादर करण्याची संधी मिळेल.
काल्पनिक मालिका, प्रीमियम टीव्ही+ आशय, रिॲलिटी शो, खेळ आणि स्पर्धा, प्रतिभेवर आधारित कार्यक्रम आणि इतर अनस्क्रिप्टेड संकल्पनांसह विविध स्वरूपांमध्ये सादरीकरणे मागविण्यात येत आहेत. निवडलेल्या अर्जदारांना त्यांच्या संकल्पना एसपीएनआयकडे विचारार्थ आणि संभाव्य विकासासाठी सादर करण्यास आमंत्रित केले जाईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आश्रयाखाली, एनएफडीसीचे उद्योग व्यासपीठ 'वेव्ह्स बाजार' हे भारतातील माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेतील हितधारकांना सर्जनशील प्रतिभेशी जोडते. या सहकार्याचा उद्देश, विशेषतः प्रादेशिक बाजारपेठांमधून, मौलिक कथाकथनाच्या संधींचा विस्तार करणे आणि विविध आवाज व दृष्टिकोन व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
गौरव बॅनर्जी, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया म्हणाले की, “आपल्या उद्योगाची ताकद ही भारताचे विविध आवाज आणि दृष्टिकोन दर्शवणाऱ्या कथांमागील प्रतिभेला शोधून तिचे संगोपन करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. देशभरात प्रचंड सर्जनशील प्रतिभा आहे, आणि त्यांच्या कल्पनांना नेहमीच प्रस्थापित व्यासपीठांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत नाही. एक उद्योग म्हणून, आपण हे आवाज ऐकले जावेत आणि त्यांच्या कल्पनांना व्यासपीठ मिळावे यासाठी अधिक मार्ग तयार केले पाहिजेत. वेव्हज बाजारच्या (WAVES Bazaar) माध्यमातून एनएफडीसीसोबत (NFDC) केलेली आमची भागीदारी हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. यामुळे लेखक आणि निर्मात्यांना त्यांच्या मूळ संकल्पना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ मिळत आहे. हे व्यासपीठ विविध भाषा आणि स्वरूपांमध्ये, काल्पनिक (fiction) आणि अ-काल्पनिक (non-fiction) अशा दोन्ही प्रकारच्या साहित्याचा समावेश करते. आम्ही नवीन दृष्टिकोन आणि आकर्षक कल्पना शोधण्यास उत्सुक आहोत, ज्यांचे रूपांतर प्रेक्षकांसाठी कथा आणि आशयामध्ये होऊ शकेल.”
जी. कृष्णकुमार, अध्यक्ष, एनएफडीसी: “इफ्फी हा सिनेमाचा आणि तो शक्य करणाऱ्या लोकांचा उत्सव आहे. तो जगभरातील कथा, संस्कृती आणि सर्जनशील आवाजांना एकत्र आणतो. चित्रपट आणि आवाजांमधील विविधताच या आवृत्तीला विशेष बनवते. ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ ही संकल्पना सिनेमाचा आत्मा सुंदरपणे टिपते.”
धीरज सिंग, व्यवस्थापकीय संचालक, एनएफडीसी: “वेव्ह्स बाजार सर्जनशील प्रतिभा आणि उद्योग यांच्यात अर्थपूर्ण संबंध निर्माण करत आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियासोबतचे हे सहकार्य लेखक, निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेसना विविध भाषा आणि फॉरमॅटमध्ये मूळ संकल्पना सादर करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देते.”