PhonePe IPO ची तयारी सुरू, सेबीकडे दाखल केला मसुदा; 13,310 कोटी उभारणार (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
PhonePe IPO Marathi News: वॉलमार्टच्या मालकीची डिजिटल पेमेंट कंपनी फोनपेने त्यांच्या आयपीओसाठी मसुदा कागदपत्रे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) कडे दाखल केली आहेत, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने २४ सप्टेंबर रोजी कंपनीच्या प्रवक्त्याचा हवाला देऊन ही माहिती दिली.
कंपनीने हे कागदपत्रे गोपनीय मार्गाने दाखल केली आहेत, म्हणजेच सध्या त्यांची माहिती जनतेसाठी उपलब्ध होणार नाही. तथापि, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी १५ अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹१.३३ लाख कोटी) च्या मूल्यांकनासह १.५ अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹१३,३०८ कोटी) उभारण्याची योजना आखत आहे.
कंपनीने सांगितले की, तिने बाजार नियामक सेबी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) कडे तिच्या इक्विटी शेअर्सच्या सुरुवातीच्या सार्वजनिक ऑफरिंगसाठी प्री-फाइल्ड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (पीडीआरएचपी) दाखल केला आहे.
१६ एप्रिल रोजी, फोनपे एका खाजगी कंपनीतून सार्वजनिक कंपनीत रूपांतरित झाले. ही प्रक्रिया भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग आहे. फोनपेने फेब्रुवारीमध्ये आयपीओची योजना सुरू केली.
यापूर्वी, कंपनीने डिसेंबर २०२२ मध्ये आपले मुख्यालय सिंगापूरहून भारतात हलवले होते. यासोबतच, कंपनीने आपला नॉन-पेमेंट व्यवसाय वेगवेगळ्या उपकंपन्यांमध्ये विभागला होता.
फोनपेच्या आर्थिक कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीचा तोटा कमी झाला आहे. २०२४-२५ मध्ये कंपनीचा तोटा १३.४% ने कमी होऊन १,७२७.४ कोटी झाला. गेल्या वर्षी हा तोटा १,९९६.१ कोटी होता. कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, ज्यामुळे तोटा कमी होण्यास मदत झाली आहे. कंपनीचा ऑपरेटिंग महसूल ४०.४% ने वाढून ७,११४.८ कोटी झाला आहे, जो गेल्या वर्षी ५,०६४.१ कोटी होता. कंपनीचा खर्चही वाढला आहे.
ऑगस्टमध्ये, सेबीने स्पीकर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची उत्पादक कंपनी बोटच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) ला मान्यता दिली. बोटची मूळ कंपनी, इमॅजिन मार्केटिंग लिमिटेडने एप्रिल २०२५ मध्ये आयपीओसाठी गोपनीयपणे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला होता. बोट व्यतिरिक्त, इतर १३ कंपन्यांनाही मान्यता मिळाली.
बोटच्या आयपीओचा एकूण आकार ₹२,००० कोटी असू शकतो. कंपनीचे मूल्यांकन सुमारे ₹१३,००० कोटी असू शकते. या आयपीओमधील नवीन शेअर इश्यू आणि विक्रीसाठी ऑफरची माहिती अद्याप सार्वजनिक केलेली नाही. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई वर सूचीबद्ध केले जातील. आयपीओ लाँच तारीख आणि किंमत पट्टा यासारखे तपशील नंतर उघड केले जातील.