रतन टाटांचे पाळीव कुत्र्यावरील प्रेम..., मृत्यूपत्रात जोडले नाव; करुन गेलेत त्याच्यासाठी 'ही' तरतूद!
देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे अलिकडेच निधन झाले आहे. त्यांच्या नावे अब्जावधींची संपत्ती असून, त्यांनी विवाह केलेला नाही. त्यामुळे त्यांची संपत्ती नेमकी कोणाकडे जाणार? असा सर्वांनाच पडणारा प्रश्न असतो. अशातच आता रतन टाटा यांचे मृत्युपत्र समोर आले आहे. त्यात त्यांच्या संपत्तीबाबत काही नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही नावे वाचल्यानंतर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण यात असलेली नावे ही तुम्हांला देखील विचार करायला भाग पाडू शकतात.
टाटांच्या मृत्युपत्रात पाळीव कुत्राचे नाव
रतन टाटा यांची एकूण संपत्ती 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपली संपत्ती त्यांच्या फाउंडेशनला, भाऊ जिमी टाटा, सावत्र बहिणी शिरीन आणि डीआना जीजीभॉय, घरातील कर्मचारी आणि इतरांना दिली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याचे देखील नाव टाकले आहे. रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांनी आपल्या मृत्यूपत्रात पाळीव कुत्रा टिटोचे नाव देखील समाविष्ट केले आहे. त्यांचा दुसरा सहाय्यक सुब्बय्या याचाही मृत्यूपत्रात उल्लेख आहे. याशिवाय शंतनू नायडू यांचेही नाव आहे.
रतन टाटा यांच्या एकूण मालमत्तेत अलिबागमधील 2000 चौरस फुटांचा समुद्रकिनारी बंगला, मुंबईतील जुहू तारा रोडवरील 2 मजली घर, 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुदत ठेवी आणि 165 डॉलरची होल्डिंग कंपनी टाटा सन्समधील 0.83 टक्के स्टेक यांचा समावेश आहे.
टिटोची आजीवन काळजी घेतली जाणार
मीडीया रिपोर्टनुसार, रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात नमूद केले आहे की, त्यांच्या जर्मन शेफर्ड टिटोची आजीवन काळजी घेतली जाईल. रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात, त्यांच्या प्रिय जर्मन शेफर्ड, टिटोच्या आजीवन काळजीची खात्री केली आहे. जे रतन टाटा यांच्या प्राणीमात्रांवरील करुणेचे प्रतिक आहे. मृत्युपत्रानुसार, टिटो हा कुत्रा टाटांचे दीर्घकाळचे शेफ राजन शॉ यांच्या देखरेखीखाली असणार आहे.
प्राणीमात्रांसाठी नाकारला होता पुरस्कार
दरम्यान, याआधीही 2018 मध्ये टाटांचे प्राण्यांवरील प्रेम दिसून आले आहे. जेव्हा त्यांनी आपल्या आजारी कुत्र्याजवळ राहण्यासाठी राजा चार्ल्स ३ कडून शाही सन्मान स्वीकारण्यास नकार दिला होता. टाटा यांना बकिंगहॅम पॅलेस येथे तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्सकडून जीवनगौरव पुरस्कार मिळणार होता. मात्र, आपल्या लाडक्या कुत्र्यासोबत राहण्यासाठी त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता.