चेक क्लिअरन्सवर RBI चा मोठा निर्णय, आता काही तासात बँक खात्यात जमा होणार पैसे
तुम्हाला आता चेक म्हणजेच धनादेश क्लिअरन्ससाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चेक क्लिअरिंगची वेळ काही तासांपर्यंत कमी करणे आणि त्याशी संबंधित जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहे. सध्या चेक डिपॉझिटपासून चेक क्लिअरन्सपर्यंत दोन दिवस लागतात. मात्र नव्या प्रणालीमध्ये धनादेश जमा झाल्यानंतर काही तासांतच ‘क्लीअर’ होणार आहे. या निर्णयामुळे आता चेक क्लिअरन्सनंतर काही तासाच पैसे जमा होणार आहेत.
गुरूवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या पतधोरण आढाव्याची घोषणा करताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, “चेक क्लिअरिंग सुरळीत करणे, सेटलमेंट जोखीम कमी करणे आणि ग्राहकांना उत्तम सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने, चेक ट्रंकेशन सिस्टम (CTS) सुरू करण्यात आली आहे. “सीटीएसची सध्याची प्रक्रिया बदलण्याचा प्रस्ताव आहे.” सध्याच्या सीटीएस प्रणाली अंतर्गत ‘बॅचेस’मध्ये प्रक्रिया करण्याऐवजी, कामकाजाच्या वेळेत सतत क्लिअरिंगची व्यवस्था केली जाईल.
हे सुद्धा वाचा: कर्ज घेणं स्वस्त होणार की महागणार? EMI ही वाढणार…., आरबीआयकडून बँकेचे पतधोरण जाहीर
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, “नवीन प्रणाली अंतर्गत, चेक ‘स्कॅन’ केला जाईल, काही तासांत सादर केला जाईल आणि क्लिअर केला जाईल. याचा परिणाम काही तासांत चेक क्लिअरिंग होईल तर सध्या यास दोन दिवस लागतात (T+1). यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी करण्यात येतील, असे दास यांनी सांगितले. याशिवाय, आरबीआयने प्रत्येक पंधरवड्याला त्यांच्या ग्राहकांबद्दल बँकांनी दिलेल्या क्रेडिट माहिती कंपन्यांना अहवाल देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या हा अहवाल महिन्यातून एकदा दिला जातो.
हे सुद्धा वाचा: मुंबईतील सर्वात महागड्या परिसरात ‘या’ उद्योगपतीने खरेदी केला आलिशान वाडा; …किंमत ऐकून अवाक व्हाल!
आर्थिक घडामोडींमध्ये होत असलेल्या वाढीचा दाखला देत आणि महागाईवर बारीक नजर ठेवून, RBI ने सलग नवव्यांदा पॉलिसी रेट अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे व्याजदर कपातीची अपेक्षा असलेल्या सामान्य लोकांची निराशा झाली आहे. मे 2022 पासून सलग सहा दरात 250 बेसिस पॉइंट्सने वाढ केल्यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दर वाढीचे चक्र थांबवण्यात आले होते आणि ते अजूनही याच पातळीवर आहे.