घरांच्या किंमती वाढणार की घटणार? पाहा... काय सांगतोय रिअल इस्टेट क्षेत्रातील अहवाल!
देशातील अनेक शहरांमध्ये मालमत्तेच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ज्यामुळे लोकांना घर खरेदी करणे अवघड होत आहे. अलिकडेच समोर आलेल्या एका अहवालानुसार, देशातील तीन शहरांमध्ये प्रमुख रहिवासी भागांमध्ये मालमत्तेच्या किमती १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्या आहेत. रिअल इस्टेट कन्सलटंट फर्म नाइट फ्रॅंकच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अर्थात एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत देशातील मालमत्तेच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
घरांच्या किमती वाढण्यात मुंबई जगात दुसऱ्या क्रमांकावर
एप्रिल ते जून २०२४ या तीन महिन्यांमध्ये देशातील प्रामुख्याने मुंबई, नवी दिल्ली आणि बंगळुरू या प्रमुख तीन शहरांमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मुंबईमध्ये तर घरांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की, मालमत्तेच्या दरात वाढ होणाऱ्या जगातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
रिअल इस्टेट कन्सलटंट फर्म नाइट फ्रॅंकच्या अहवालानुसार, जुनमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये मुंबईतील घरांच्या किमती वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. अर्थात मागील वर्षीच्या जुनच्या तिमाहीमधील घरांच्या किंमतींच्या तुलनेत यावर्षीच्या तिमाहीत मुंबईतील घरांच्या किंमती १३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. हा आकडा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हेही वाचा – गौतम अदानींनी एका… दिवसात 4251 कोटी कमावले, वाचा… कशी झाली इतकी मोठी कमाई!
नवी दिल्ली घरांच्या किंमती वाढण्यात जगात तिसऱ्या क्रमांकावर
राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीच्या सर्वच रहिवासी भागांमध्ये घरांच्या किंमतींमध्ये १० टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली आहे. नवी दिल्ली येथील रहिवासी भागातील जागांचे दर वार्षिक आधारावर जूनमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये 10.6 टक्क्यांनी वाढले आहेत. तर बंगळुरू येथील घरांच्या दरात वार्षिक आधारावर 3.7 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. घरांच्या किंमती सर्वाधिक वाढणाऱ्या शहरांमध्ये नवी दिल्ली तिसऱ्या तर बंगळुरू जागतिक पातळीवर १५ व्या स्थानावर आहे.
घरांच्या किंमती चढ्याच राहण्याची शक्यता
दरम्यान, भारतीय लोकांकडे सध्या मोठ्या प्रमाणात पैसा येत आहे. याशिवाय भारतीय लोक वेगाने श्रीमंत होत आहे. असे असताना आता भारतीय लोकांच्या आकांक्षा देखील वाढत आहे. परिणामी, भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. देशांतर्गत बाजारातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या वाढीमध्ये सर्वीधिक योगदान हे प्राथमिक क्षेत्रातील आहे. त्यामुळे येत्या काळात भारतीय बाजारात घरांच्या मागणीत वाढ होऊन, घरांच्या किंमती या चढ्याच राहण्याची शक्यता असल्याचे नाइट फ्रॅंकने आपल्या अहवालात म्हटले आहे.