शेअर बाजारात पडझडीचे सत्र सुरुच; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण! वाचा... आज काय घडलंय!
मागील संपूर्ण आठवडा हा शेअर बाजारासाठी निराशाजनक राहिला आहे. अशातच आता चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. विदेशी गुंतवणूकदारांच्या तीव्र विक्रीमुळे भारतीय शेअर बाजार सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात जोरदार विक्रीसह बंद झाला आहे. बँकिंग, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअर्संना यात सर्वाधिक फटका बसला आहे. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभाग मोठ्या प्रमाणात घसरले आहे.
गुंतवणूकदारांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण
आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 638 अंकांच्या घसरणीसह 81050 अंकांवर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 198 अंकांच्या घसरणीसह 24,817 अंकांवर बंद झाला आहे. त्यामुळे आज बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.
हे देखील वाचा – अदानी समूहाचा सिमेंट उद्योगात दबदबा! 10,000 कोटी रुपयांत खरेदी करणार ‘ही’ कंपनी!
बँकिंग, ऊर्जा क्षेत्रातील समभागांना सर्वाधिक फटका
आज शेअर बाजारात बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांना सर्वाधिक फटका बसला आहे. बँक निफ्टी 837 अंकांनी अर्थात 1.63 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टीचा ऊर्जा निर्देशांक 2.52 टक्के किंवा 1050 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. याशिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स देखील घसरले आहे. निफ्टी मिडकॅप निर्देशांकही 1170 अंकांनी किंवा 2 टक्क्यांनी आणि निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 495 अंकांनी किंवा 2.75 टक्क्यांनी घसरून बंद झाला आहे. आज प्रामुख्याने आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये थोडीफार तेजी दिसून आली आहे.
गुंतवणूकदारांना तब्बल नऊ लाख कोटींचा फटका
शेअर बाजारात चौफेर विक्री झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 452.20 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे मागील सत्रात 460.89 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8.69 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)