व्याजदरात कपातीचे संकेत, अमेरिकी शेअर बाजाराची मोठी उसळी; सोमवारी भारतीय बाजारातही तेजीची शक्यता!
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका हा बलाढ्य देश मोठ्या आर्थिक गर्तेत सापडला आहे. अमेरिकेत आर्थिक मंदीची चाहूल असल्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून काही दिवसांपुर्वी अमेरिकी शेअर बाजारासह जगभरातील शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. अशातच आता शेअर बाजाराला आधार देणारी माहिती समोर आली आहे. यूएस सेंट्रल बँकेने व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता अमेरिकेत लवकरच कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
श्रमिक बाजाराला पाठिंबा देणे आवश्यक
यूएस सेंट्रल बँकेने व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी जॅक्सन होल रिट्रीटला संबोधित करताना सांगितले की, सेंट्रल बँकेने आपल्या व्याजदर धोरणात बदल करण्याची वेळ आली आहे. महागाई वाढण्याचा धोका कमी झाला असून, आता जोखीम रोजगाराकडे वळाली आहे. त्यानंतर फेडरल रिझर्व्हने श्रमिक बाजाराला पाठिंबा देणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे आता लवकरच यूएस फेडरल रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा – गौतम अदानींनी एका… दिवसात 4251 कोटी कमावले, वाचा… कशी झाली इतकी मोठी कमाई!
17-18 सप्टेंबर 2024 च्या बैठकीत निर्णयाची शक्यता
सेंट्रल बँकेने आपल्या व्याजदर धोरणात बदल करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता व्याजदर वाढीची कोणतीही शक्यता नसून, अमेरीकी फेडरल सरकार दर कपातीच्या बाजूने आहे. याबाबत जेरोम पॉवेल म्हणाले आहे की, महागाई वाढण्याचा धोका आता टळला असून, रोजगार कमी होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे श्रमिक बाजाराला पाठिंबा देणे आवश्यक झाले आहे. 17-18 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदरात एक चतुर्थांश कपात होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन, आता अमेरीकी अर्थव्यवस्थेसमोरील समस्या संपुष्टात येण्यास मदत होणार आहेत.
अमेरिकन शेअर बाजारात तेजी
फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. डाऊ जोन्स 0.77 टक्के किंवा 311 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. तर नॅसडॅक 1.02 टक्के किंवा 174 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. तर एस एंड पी 0.73 टक्क्यांनी अर्थात 500 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. भारतीय शेअर बाजारही आज (ता.२३) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी वाढीसह बंद झाला. अशातच आता फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या विधानानंतर सोमवारी भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त जाणकरांकडून व्यक्त केली जात आहे.