विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय; सेन्सेक्स 1000 अंकांनी तर निफ्टी 330 अंकांनी घसरला!
चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजाराने आपली घसरती स्थिती कायम ठेवली आहे. आज (ता.२२) विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. आज दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स 1000 अंकांनी तर निफ्टी 330 अंकांनी घसरला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील मोठी घसरण दिसून आली आहे.
गुंतवणूकदारांमध्ये मोठी नाखुशी
शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 8.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज (ता.२२) शेअर बाजार बंद होताना, मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 930 अंकांनी घसरून, 80,220 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 310 अंकांच्या घसरणीसह 24,472 अंकांवर बंद झाला आहे. ज्यामुळे आज बाजारात गुंतवणूकदारांमध्ये मोठी नाखुशी पाहायला मिळाली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – महागाई नियंत्रणासाठी सरकार घेणार मुकेश अंबानींची मदत, …रिलायन्स रिटेलशी बोलणी सुरु!
गुंतवणूकदारांचे १४ लाख कोटी रुपयांचे नुकसान
दरम्यान, सध्या भारतीय शेअर बाजारातील घसरणीच्या वादळामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 444.79 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 453.65 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना 8.84 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गेल्या दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे १४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोणते शेअर्स वाढीसह बंद
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 शेअर्स पैकी केवळ एक समभाग वाढीसह बंद झाला आहे. 29 शेअर्स हे तोट्यासह बंद झाले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 3 शेअर्स हे वाढीसह आणि 47 तोट्यासह बंद झाले आहेत. वाढत्या शेअर्समध्ये आयसीआयसीआय बँक 0.74 टक्के, नेस्ले 0.10 टक्के, इन्फोसिस 0.04 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले आहे. तर बीईएल ३.७९ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ३.६३ टक्के, कोल इंडिया ३.३६ टक्के, अदानी एंटरप्रायझेस ३.२९ टक्के, एसबीआय २.९७ टक्के, पॉवर ग्रीड २.७९ टक्के घसरले आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)