कृष्ण जन्माष्टमीला सोमवारी शेअर बाजार उघडणार की बंद राहणार? वाचा... सुट्ट्यांची यादी
कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोमवारी अनेक राज्यातील बँकांसह अनेक सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. याआधी शनिवार आणि रविवारीही बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये सलग तीन दिवस सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. अशातच आता सोमवारी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त असल्याने, सोमवारी शेअर बाजार बंद राहणार की सुरु राहणार? असा प्रश्न शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या अनेकांना पडला आहे.
कृष्ण जन्माष्टमीला शेअर बाजार सुरु राहणार
मात्र, कृष्ण जन्माष्टमीनिमित्त शेअर बाजाराला सुट्ट्या नसतील. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) चे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहिल. गुंतवणूकदार शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतात. असे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.
शेअर बाजार दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी बंद असतो. या काळात बाजारात कोणतेही काम होत नाही. सामान्य दिवश, शेअर बाजारात ट्रेडिंग सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत होते. शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त राष्ट्रीय आणि सांस्कृतिक सणांच्या दिवशी शेअर बाजार बंद असतो. या महिन्यात 15 ऑगस्ट रोजी शेअर बाजार बंद होता. मात्र, आता सोमवारी जन्माष्टमीनिमित्त शेअर बाजाराला सुट्टी नसणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हेही वाचा – झोमॅटोने आणले नवीन फिचर, आता दोन दिवस आधीच करता येणार ऑर्डर शेड्यूल; वाचा… सविस्तर
शेअर बाजाराला सुट्ट्या कधी?
आठवड्याच्या शेवटी (शनिवार आणि रविवार) व्यतिरिक्त शेअर बाजारात इतर काही दिवस सुट्ट्या असतात. या सुट्ट्यांची यादी बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या यादीनुसार, या वर्षाच्या उर्वरित महिन्यांत या तारखांना शेअर बाजारात सुट्ट्या असणार आहे.
2 ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंती
1 नोव्हेंबर : दिवाळी
15 नोव्हेंबर: गुरु नानक जयंती
25 डिसेंबर: ख्रिसमस
26 ऑगस्टला बँकेला सुट्टी?
दरम्यान, कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोमवारी 26 ऑगस्ट रोजी काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. ज्या राज्यांमध्ये सोमवारी सुट्टी आहे, तेथे बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. तर त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, केरळ, नागालँड, नवी दिल्ली आणि गोवा या राज्यांमध्ये सोमवारी बँका सुरू राहणार आहे. याउलट गुजरात, ओडिशा, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, सिक्कीम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे.