खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची जोरदार कामगिरी; प्रथमच उलाढाल 1.5 लाख कोटींच्या पार!
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने 2023-24 या आर्थिक वर्षात उत्पादन, विक्री आणि नव्या रोजगार निर्मितीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आयोगाने विक्रीत 399.69 टक्के (सुमारे 400 टक्के) वाढ, उत्पादनात 314.79 टक्के (सुमारे 315 टक्के) वाढ आणि नव्या रोजगार निर्मितीत 80.96 टक्के (सुमारे 81टक्के) वाढ नोंदवली आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये विक्रीत 332.14 टक्के वाढ, उत्पादनात 267.52 टक्के वाढ आणि नव्या रोजगार निर्मितीत 69.75 टक्के वाढ झाली होती. याबाबत आकडेवारी आज खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी जाहीर केली आहे.
उत्पादनांच्या विक्रीमध्ये विक्रम
खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांचे उत्पादन 2013-14 आर्थिक वर्षात 26,109.08 कोटी रुपये इतके होते. ते 2023-24 आर्थिक वर्षात 108,297.68 कोटींवर पोहोचले आहे. अर्थात उत्पादनांचे उत्पादनात 314.79 टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आयोगाच्या उत्पादनांचे उत्पादन 95956.67 कोटी इतके होते. तर गेल्या 10 वर्षांत खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांनी दरवर्षी नवीन विक्री विक्रम प्रस्थापित केले आहेत. 2013-14 आर्थिक वर्षात विक्री उत्पादनांची विक्री 31,154.20 कोटी इतकी होती. ती 2023-24 या आर्थिक वर्षात 1,55,673.12 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अर्थात विक्रीत 399.69 टक्के वाढ झाली आहे.
कापड उत्पादनात नवा विक्रम
गेल्या दहा वर्षांत खादी कापडाच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. 2013-14 आर्थिक वर्षात खादी कापडाचे उत्पादन 811.08 कोटी रुपये होते. ते 2023-24 आर्थिक वर्षात 295.28 टक्के वाढून, 3,206 कोटींवर पोहोचले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात खादी कापडाचे उत्पादन 2915.83 कोटी रुपयांवर होते. तर गेल्या दहा आर्थिक वर्षांत खादी कापडाची मागणीही जलद गतीने वाढली आहे. 2013-14 आर्थिक वर्षात त्याची विक्री केवळ 1,081.04 कोटी रुपये इतकी होती. ती 2023-24 आर्थिक वर्षात 500.90 टक्के वाढून, 6,496 कोटींवर पोहोचली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात खादी कापडाची विक्री 5,942.93 कोटी रुपये इतकी होती.
रोजगार निर्मितीमध्येही नवीन विक्रम
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.आयोगाने गेल्या दहा वर्षांत विक्रम प्रस्थापित केला आहे. 2013-14 आर्थिक वर्षात एकूण रोजगार 1.30 कोटी होता. तो 2023-24 आर्थिक वर्षात 1.87 कोटींवर पोहोचला आहे. अर्थात यात 43.65 टक्के वाढ झाली आहे. याप्रमाणे, 2013-14 आर्थिक वर्षात 5.62 लाख नवी नोकऱ्या निर्माण करण्यात आल्या. ज्या 2023-24 आर्थिक वर्षात 80.96 टक्के वाढून 10.17 लाखंवर पोहोचल्या आहे. ज्यामुळे ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.