मत्स्यशेतीतून शेतकऱ्यांनी साधली प्रगती; वर्षभरात मिळतायेत दीड ते दोन कोटींचा नफा!
अलिकडच्या काळात अनेक शेतकरी यशस्वी मत्स्यशेती करत आहेत. या माध्यमातून शेतकरी लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत. आज आपण मत्स्यशेतीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या एका गावाची यशोगाथा पाहणार आहेत. या गावात 40 हून अधिक मत्स्यकेंद्र आहेत. या माध्यमातून येथील शेतकरी वर्षभरात दीड ते दोन कोटी रुपयांचा नफा मिळवत आहेत.
माशांची विविध राज्यात होते विक्री
मत्स्यपालनातून कमी खर्चात जास्त नफा मिळवता येतो. उत्तर प्रदेशातील रामपूरमधील धनौरा गावातील शेतकरी मत्स्यपालनातून मोठी कमाई करत आहेत. विशेष म्हणजे या गावात 40 हून अधिक मासे उबवणी केंद्रे आहेत. या भागातील नापीक जमीन असल्याने लोकांनी मत्स्यपालन सुरू केले आणि हळूहळू संपूर्ण गावात मोठे तलाव आणि हॅचरी बांधण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
पीएम किसान योजनेचे 2000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार; 19 व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष!
करोडो मत्स्यबीजांची निर्मिती
आता या ठिकाणी करोडो मत्स्यबीज तयार होतात. जे यूपी, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाबसह विविध राज्यांमध्ये जातात. मत्स्यपालन व्यवसाय करणाऱ्या एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आपण 2003 पासून मत्स्यपालन करत आहोत. एकूण 18 एकर जमिनीवर मत्स्यबीजाचे काम करत असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. यामध्ये विविध प्रकारचे मासे तयार केले जातात.
या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या माशांची विक्री उत्तर प्रदेशातील स्थानिक बाजारपेठेसह बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाबसह विविध राज्यांमध्ये केली जाते. या विक्रीतून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळत आहे. नापीक असणाऱ्या जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी मत्स्यशेतीचा प्रयोग केला आहे.
मत्स्यकेंद्रासाठी 15 लाखांचे अनुदान
गावातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मत्स्यकेंद्र सुरु करण्यासाठी सरकारकडून 15 लाख रुपयांचे अनुदान मिळते. पण प्रकल्पासाठी एकूण खर्च हा 25 लाख रुपये होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हा प्रकल्प सुरु करण्यासाठी सरकारची चांगली मदत होते. मत्स्य विभागाच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी लिहून दिलेल्या औषधांचाही वापर आपण करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
वर्षभरात दीड ते 2 कोटींची कमाई
मत्स्यपालनाइतका नफा मिळवून देणारा दुसरा चांगला व्यवसाय नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. माशांची योग्य काळजी घेतल्यास एका शेतकऱ्याला वर्षभरात दीड ते दोन कोटी रुपये उत्पन्न सहज मिळू शकते. व्यापारी स्वत: तलावावर येऊन सर्व मासे खरेदी करून घेऊन जातात अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.