चांदीची चमक वाढणार; दरात 125000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ होण्याची शक्यता!
अलीकडच्या काळात चांदीची चमक चांगलीच वाढली आहे. देशांतर्गत असो वा जागतिक बाजारपेठ, सर्वत्र चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे. अलीकडेच देशांतर्गत बाजारात चांदीने किलोमागे 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडण्यात यश मिळविले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 12 वर्षातील उच्चांकी 34 प्रति डॉलर औंसवर पोहोचली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मते, एमसीएक्सवर चांदीची किंमत प्रति किलो 1.25 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
का झालीये चांदीच्या दरात वाढ
2024 च्या सुरुवातीपासून चांदीच्या किंमतीत प्रति औंस 10 डॉलरची वाढ दिसून आली आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात केल्यामुळे चांदीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सोन्यात जशी गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. तशीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चांदीकडे आकर्षण वाढले आहे. भारतात सणासुदीच्या निमित्ताने चांदीला मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, कॉमेक्सवर चांदीची किंमत 2024 च्या अखेरीस 40 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. एप्रिल 2011 मध्ये चांदीने प्रति औंस 50 डॉलर हा आजीवन उच्चांक गाठला होता.
चांदीची चमक वाढली
भारतातील चांदीच्या किमती आर्थिक आणि जागतिक कारणांमुळे प्रभावित झाल्या आहेत. 2008 च्या आर्थिक संकटाच्या काळात चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. तरीही त्यानंतर तीक्ष्ण पुनर्प्राप्ती झाली होती. 2011 मध्ये जागतिक अस्थिरतेच्या वातावरणात चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. सोन्याप्रमाणे चांदीलाही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून दर्जा मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळात चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
2024 मध्ये चांदीने 42 टक्के दिला परतावा
1981 मध्ये चांदी 2715 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होती. जी 2010 मध्ये 27,255 रुपये प्रति किलो आणि 2020 मध्ये 63,435 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. यावरून असे दिसून येते की, अस्थिरतेच्या वातावरणात चांदीची किंमत वाढत आहे. 2020 मध्ये चांदीच्या किंमतीत 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जी सोन्यावरील 32 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शेअर बाजारापेक्षा चांदीने चांगला परतावा दिला आहे.
चांदीची वाढ कायम राहणार
भविष्यात चांदीच्या दरात सातत्याने वाढ होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, औद्योगिक मागणीत वाढ, चीनचे आर्थिक मदत पॅकेज, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याने चांदीसाठी चांगले दिवस येतील. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या मते, मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी, चांदीमध्ये गुंतवणूक केल्यास सोन्याइतका किंवा चांगला परतावा मिळू शकतो. 12-15 महिन्यांत, चांदी एमसीएक्सवर 1.25 लाख रुपये प्रति किलो आणि कॉमेक्सवर 40 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकते.