सीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता; 18 टक्क्यांपर्यंत घसरले 'या' गॅस कंपन्यांचे शेअर्स!
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण सुरु आहे. अशातच काही कंपन्यांचे शेअर हे मोठ्या प्रमाणात धाराशाही झाल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने शेअर बाजारात सूचिबद्ध सिटी गॅस पुरवठा करणाऱ्या सीएनजी-पीएनजी कंपन्यांचे शेअर्स चांगलेच घसरले आहेत. इंद्रप्रस्थ गॅस, महानगर गॅस आणि गुजरात गॅसचे शेअर्समध्ये १८ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
संबंधित गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे प्रमुख कारण हे सरकारने या कंपन्यांना प्राधान्याने दिलेला गॅस सलग दुसऱ्या महिन्यात 20 टक्क्यांनी कमी केला आहे. एकीकडे यामुळे या कंपन्यांच्या खर्चात प्रचंड वाढ होणार आहे. तर दुसरीकडे लवकरच या कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांवर बोजा टाकावा लागणार आहे. ब्रोकरेज हाऊस सिटीच्या म्हणण्यानुसार, सिटी गॅस कंपन्यांना सीएनजीच्या किमतीत १० टक्के किंवा प्रति किलो ७ रुपयांनी वाढ करावी लागणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
कोणत्या शेअरची किती झालीये घसरण
आज (ता.१८) सोमवारी शेअर बाजार उघडताच इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड या गॅस कंपनीचा स्टॉक जवळपास 20 टक्क्यांनी घसरून 324.70 रुपयांवर आला. जो पहिल्या सत्रात 405.80 रुपयांवर बंद झाला होता. सध्या हा शेअर 18.63 टक्क्यांच्या घसरणीसह 330.45 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे महानगर गॅस कंपनीचा शेअर देखील 18.08 टक्क्यांनी घसरून, 1075.25 रुपयांवर आला आहे.
दरम्यान, सध्या महानगर गॅसचा हिस्सा 13.75 टक्क्यांच्या घसरणीसह 1132.10 रुपयांवर व्यवहार करत आहे. गुजरात गॅसचे शेअर्स देखील 9 टक्क्यांनी घसरून, 442.50 रुपयांपर्यंत खाली आले आहे. सध्या गुजरात गॅसचा शेअर 6.18 टक्क्यांच्या घसरणीसह 455.95 रुपयांवर व्यवहार करत आहे.
हे देखील वाचा – बाजार घसरणीतही रॉकेट वेगाने धावतोय ‘हा’ शेअर; आणखी 55 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता!
शेअर्समध्ये का झालीये घसरण?
सरकारने 16 नोव्हेंबर 2024 पासून शहर गॅस वितरण कंपन्यांना प्राधान्याने दिल्या जाणाऱ्या गॅसचे प्रमाण 20 टक्क्यांनी कमी केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या धोरण मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सीएनजी आणि घरगुती पीएनजी गॅसचा समावेश असलेल्या शहर गॅस वितरणाच्या प्राधान्य विभागांना एपीएमवर घरगुती नैसर्गिक वायूचे वाटप करण्याची तरतूद आहे.
दरम्यान, स्टॉक एक्स्चेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये, इंद्रप्रस्थ गॅसने सांगितले की, 16 नोव्हेंबर 2024 पासून सीएनजी (वाहतूक) साठी गॅसचे वाटप पूर्वीच्या एपीएम वाटपाच्या तुलनेत 20 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. ही मोठी कपात असून त्याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावरही होऊ शकतो, असे कंपनीने म्हटले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)