टोमॅटो शंभरी पार, ग्राहकांमध्ये असंतोष; केंद्र सरकारची दर नियंत्रणासाठी धावाधाव!
राज्यासह देशभरातील टोमॅटो उत्पादकांना अच्छे दिन आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शंभरीपर्यंत पोचलेले टोमॅटोचे दर काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. ज्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. याउलट ग्राहक मात्र भाववाढीमुळे टोमॅटो खरेदी करण्यास नापसंती दर्शवत आहे. विशेष म्हणजे टोमॅटोचे दर पाडण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. केंद्र सरकारने सामान्य ग्राहकांना ६० रुपये प्रति किलो दराने स्वस्त दरात टोमॅटो विक्री सुरु केली आहे. मात्र, असे असतानाही टोमॅटो दर १०० रुपये प्रति किलोची पातळी सोडण्यास तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे.
टोमॅटो दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न
केंद्र सरकारने मागील आठवड्यात राजधानी दिल्ली आणि काही शहरांमध्ये टोमॅटोची किरकोळ विक्री सुरु केली आहे. सरकारने नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एनसीसीएफ या सहकारी संस्थेच्या माध्यमातून ६० रुपये प्रति किलो दराने ग्राहकांना स्वस्तात टोमॅटो विक्री सुरु केली आहे. मात्र असे असताना टोमॅटो दर नियंत्रणात येत नाहीये. ज्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटो दरवाढीवरून ग्राहकांचा संताप होत आहे.
का होतीये टोमॅटोची दरवाढ?
एकीकडे देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. ज्यामुळे टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. दक्षिणेकडील राज्यांमधून टोमॅटोची आवक सुरु झाली आहे. मात्र, काही भागांमध्ये टोमॅटो पिकावर परिणाम झाला आहे. परिणामी, बाजारात टोमॅटोची पूर्तता होण्यास अडचण निर्माण होत आहे. मागील आठवड्यात टोमॅटोचे दर काहीसे खाली आले होते. मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये किरकोळ बाजारात टोमॅटो ८० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि दिल्ली येथील किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
हेही वाचा : इन्फोसिसच्या अडचणीत वाढ; कंपनीला मिळाली 32,000 कोटींच्या जीएसटी चोरीची नोटीस!
गतवर्षीही दरात मोठी वाढ
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ दिसून आली होती. गतवर्षी परिस्थिती इतकी बिकट झाली होती, की किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव १६० रुपये किलोवर पोहोचला होता. त्यानंतर सरकारने सहकारी संस्थांच्या मदतीने अनेक शहरांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली. तर मागील वर्षी अनेक टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटो पिकातून कोट्यधीश झाल्याचे समोर आले होते.