नाव मोठं लक्षण खोटं; 'हा' बलाढ्य देश कर्जाच्या विळख्यात, व्याज भरताना येतोय नाकी दम!
जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाणारी अमेरिकी अर्थव्यवस्था कर्जाच्या विळख्यात सापडली आहे. अमेरिकेच्या फेडरल सरकारवरील कर्जाचा डोंगर 35 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचला आहे. विशेष म्हणजे २०१९ नंतर अमेरिका कर्जाच्या खाईत अधिकच अडकला गेला. २०१९ नंतर अमेरिकेतील कर्जाच्या आकड्यात 13 ट्रिलियन डॉलरने वाढ नोंदवली गेली आहे. जी भारतीय अर्थव्यवस्थेच्या जवळपास तीन पट अधिक आहे.
कर्ज भरण्यासाठी इतर खर्चात कपात
दरम्यान, अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंत तेथील फेडरल सरकारच्या कर्जात इतकी मोठी वाढ कधीही दिसून आलेली नाही. विशेष म्हणजे सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या या देशाचे हाल असे झाले आहे की, अमेरिकेला कर्ज भरण्यासाठी इतर खर्च कमी करावे लागत आहे. अमेरिकेचे कर्ज दर तीन ते पाच महिन्यांनी जवळपास एक ट्रिलियन डॉलरने वाढत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या फेडरल सरकारवरील कर्जाचा आकडा 34 ट्रिलियन डॉलरवर पोहचला होता. जो सध्या 35 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचला आहे.
(फोटो सौजन्य : istock)
दररोज भरावं लागतंय 1.8 अब्ज डॉलर व्याज
दरम्यान, आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ याबाबात अंदाज व्यक्त करत आहे की, अमेरिकेचा कर्जाचा आकडा याच वेगाने वाढत राहिल्यास वर्ष २०५४ हा कर्जाचा आकडा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या 166 टक्के इतका होईल. त्यामुळे आता हे तर स्पष्ट झाले आहे की, अमेरिकेच्या सरकारची कमाई कमी आणि खर्चात वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेची स्थिती अशी आहे की, फेडरल सरकारला व्याजाच्या रूपात दररोज 1.8 अब्ज डॉलर इतके व्याज भरावे लागत आहे.
जाणकारांच्या मते, “अमेरिकी अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने चांगली योग्य बाब नाहीये. परिस्थिती इतकी खालावली आहे की आज अमेरिकेला दररोज १.८ अब्ज डॉलर्स व्याजासाठी खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे आता कर्ज फेडण्याच्या नादात अमेरिकी अर्थव्यवस्था ढासळल्याशिवाय राहणार नाही. सध्याच्या घडीला अमेरिकी सरकारला संशोधन आणि विकास, पायाभूत सुविधा आणि शिक्षणावर होणाऱ्या एकूण खर्चापेक्षा व्याज भरण्यासाठी जास्त पैसा खर्च करावा लागणार आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत असताना आणि बेरोजगारी कमी असताना अमेरिकेचे कर्ज वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे.” असेही जाणकारांनी म्हटले आहे.