
फोटो सौजन्य - Social Media
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात महापुरुषाचा अवमान केल्याच्या आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी विद्यापीठात शिक्षण घेत असणाऱ्या १० विद्यार्थ्यांना निलंबित घोषित करण्यात आले होते. या प्रकरणामुळे विद्यापीठाच्या परिसरात फार मोठे तणावाचे वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे. दोन विद्यार्थी गटांमध्ये वाद वाढल्यानंतर एका गटाने अपमानास्पद घोषणाबाजी झाल्याची तक्रार प्रशासनाकडे दाखल केली होती. तक्रारीनंतर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने तपास सुरू करून कारवाई केली.
मात्र निलंबित विद्यार्थ्यांनी प्रशासनावर जातीय भेदभावाचा आरोप केला आहे. तसेच विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या कारवाईला विरोध दर्शवला आहे. कोणतीही सखोल चौकशी न करता अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाला नवा वळण मिळाले आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात झालेल्या एका रॅलीदरम्यानही याच विद्यार्थ्यांकडून महापुरुषाचा अवमान झाल्याची तक्रार विद्यापीठाकडे आली होती. संबंधित विद्यार्थ्यांना आपली बाजू सविस्तर मांडण्यासाठी वेळ देण्यात आला. सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतरच निलंबनाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कुलसचिव कादर नवाज खान यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वसतिगृहात विजय साजरा कारण्यातव येत होता. विजयाच्या या रॅलीदरम्यान उपस्थित काही विद्यार्थ्यांनी देशातील थोर महापुरुषाचा अपमान केल्याचा आरोप विरोधी गटाने केला होता. ही तक्रार मिळताच प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला आणि 14 दिवसांसाठी 10 विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. ११ नोव्हेंबर रोजी हे निलंबन करण्यात आले असून विद्यार्थी २५ तारखेपर्यंत निलंबित राहणार आहेत.
या कारवाईनंतर विद्यार्थी गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून विद्यापीठातील शैक्षणिक वातावरणावर त्याचा परिणाम होत आहे. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने परिसरातील सुरक्षाही वाढवली असून पुढील कारवाईबाबत चर्चाही सुरू आहे. पुढे काय घडून येईल? काय वळण येईल? याबाबत संपूर्ण देशभराचे लक्ष या बातमीकडे लागून आहे.