सौजन्य-iStock
AICTE: ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) द्वारे BBA, BCA आणि BMS च्या गुणवंत मुलींसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत, एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांमध्ये बीसीए, बीबीए किंवा बीएमएसचे शिक्षण घेत असलेल्या आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) श्रेणीतील मुलींना ही शिष्यवृत्ती दिली जाईल.या शिष्यवृत्ती अंतर्गत, AICTE ३००० गुणवंत विद्यार्थिनींना दरवर्षी २५००० रुपये प्रदान करणार आहे. या शिष्यवृत्तीमुळे त्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय त्यांचा अभ्यास सहज पूर्ण करता येईल.
प्रत्येक वर्ष ७.५ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती
ही शिष्यवृत्ती योजना या शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) लागू करण्यात येणार आहे. एकूण ३००० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत दरवर्षी एकूण 7.5 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून BBA, BCA आणि BMS अंडरग्रेजुएट मॅनेजमेंट कोर्सेसचा आता AICTE अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रातील मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी ही शिष्यवृत्ती देणायत येत आहे. त्यामुळे या क्षेत्रात मुल आणि मुली यांमधील समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. एआयसीटीईचे अध्यक्ष प्राध्यापक टी.जी. सीताराम माहिती देताना म्हणाले की, दरवर्षी या अभ्यासक्रमांमध्ये मुलींची संख्या सातत्याने वाढत आहे. सत्र २०२३-२४ मध्ये मुलींच्या नोंदणीची संख्या ३९ टक्के नोंदवली गेली.
AICTE च्या अंतर्गत BBA,BMS आणि BCA
व्यवस्थापन आणि संगणक अॅप्लिकेशन अभ्यासक्रमात एकसमान गुणवत्ता आणि शैक्षणिक मानके राखण्याच्या उद्देशाने, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने २०२४-२५ पासून BBA, BMS आणि BCA अभ्यासक्रम देणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे नियमन करण्याचा निर्णय घेतला होता. याकरिताच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची Common Entrance Test (CET) घेण्यात आली. याची या शैक्षणिक वर्षासाठी Common Entarance Test (CET) २९ मे २०२४ रोजी पार पडली. आतापर्यंत एआयसीटीई केवळ एमबीए आणि एमसीए सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे नियमन करत होते.