भारतातील आघाडीच्या डायग्नोस्टिक सेवा देणाऱ्या कंपनींपैकी एक, मेट्रोपॉलिस हेल्थकेयर लिमिटेडने आपला नवीन उपक्रम ‘मेट्रोपॉलिस इन्स्टिट्यूट ऑफ लॅबोरेटरी एज्युकेशन अँड स्किलिंग’ (MiLES) सुरु केल्याची घोषणा आज केली. आरोग्य देखभाल क्षेत्रामध्ये शैक्षणिक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये यामधील अंतर भरून काढणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. MiLES मार्फत मेट्रोपॉलिस हेल्थकेयर लिमिटेडने डीवाय पाटील (डीम्ड टू बी) युनिव्हर्सिटी, नवी मुंबईसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे, ज्याअंतर्गत फेलोशिप कोर्सेस चालवले जातील. एका नामांकित शैक्षणिक संस्थेसोबत करण्यात आलेली ही भागीदारी आरोग्य देखभाल क्षेत्रातील व्यावसायिकांना आधुनिक ज्ञान व कौशल्ये आत्मसात करून सक्षम बनवण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे.
या विषयात फेलोशिप कोर्सेस
डीवाय पाटील (डीम्ड टू बी) युनिव्हर्सिटी, नवी मुंबईच्या सहयोगाने मेट्रोपॉलिस ऍडवान्स्ड क्लिनिकल केमिस्ट्री, ऍडवान्स्ड हेमॅटोपॅथोलॉजी, ऍडवान्स्ड सर्जिकल पॅथोलॉजी, क्वालिटी अश्युरन्स इन लॅबोरेटरी मेडिसिन आणि मॉलिक्युलर पॅथोलॉजी अँड सायटोजेनोमिक्स या विषयांमध्ये फेलोशिप कोर्सेस सुरु करत आहे. पोस्ट-एमडी आणि डीएनबी विद्यार्थ्यांसाठी डिझाईन करण्यात आलेल्या या कोर्सेसमध्ये रोगनिदान तंत्रज्ञानातील नवनवीन प्रगतीवर लक्ष केंद्रित करत सैद्धांतिक ज्ञान आणि व्यावहारिक प्रशिक्षण यांची सांगड घालण्यात आली आहे. लॅबोरेटरी इमर्शन, वास्तविक जगातील केस स्टडीज आणि सहायक तंत्रज्ञानामार्फत, मेट्रोपॉलिस हेल्थकेयरच्या अनुभवी विषय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत कौशल्ये विकसित करण्याची संधी या कोर्सेसमध्ये मिळेल. शैक्षणिक क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची संस्था असलेल्या डीवाय पाटील (डीम्ड-टू-बी) युनिव्हर्सिटीचा वारसा या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचा ठरेल. यामध्ये संशोधन आणि प्रकाशनाच्या संधीही पुरवल्या जातील, वैद्यकीय निदान क्षेत्राच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यात सक्षम बनण्यासाठी हे उपयुक्त ठरेल.
आरोग्यक्षेत्रातील कौशल्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल
मेट्रोपॉलिस हेल्थकेयर लिमिटेडचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री सुरेंद्रन चेम्मेन्कोतील म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्रातील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आरोग्य देखभालीमध्ये उच्च कुशल मनुष्यबळ किती आवश्यक आहे हे मेट्रोपॉलिसमध्ये आम्ही जाणतो. मनुष्यबळ विकास आणि कौशल्यवृद्धी यामध्ये प्रगती घडवून आणण्यावर सरकारने आपले लक्ष केंद्रित केले आहे, त्याला अनुसरून MiLES हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. डीवाय पाटील (डीम्ड टू बी) युनिव्हर्सिटीसोबत आमची भागीदारी उद्योग आणि शिक्षणक्षेत्र यांच्या उत्तम समन्वयातून आरोग्यक्षेत्रातील कौशल्यांमध्ये असलेल्या कमतरता दूर करण्यासाठी उचलण्यात आलेले एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. आरोग्य देखभाल क्षेत्रातील प्रोफेशनल्सना आपल्या रुग्णांना अतुलनीय देखभाल सेवा देता याव्यात आणि त्याचवेळी आरोग्य देखभाल व्यवस्थेच्या प्रचंड मागण्या प्रभावीपणे पूर्ण करता याव्यात यासाठी आवश्यक ज्ञान व व्यावहारिक अनुभव प्रदान करून सक्षम बनवण्यासाठी हे कोर्सेस डिझाईन करण्यात आले आहेत.”
आम्ही आणि मेट्रोपॉलिस मिळून आरोग्यसेवा शिक्षणात नवी मानके निर्माण करू
डीवाय पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे डीन डॉ राजीव राव म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन ज्ञान आणि उद्योगक्षेत्राला आवश्यक नैपुण्ये यांचा समावेश असलेले, विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करणारे, नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उद्युक्त करणारे शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध करवून देत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. MiLES उपक्रमामार्फत मेट्रोपॉलिस हेल्थकेयरसोबत आमची भागीदारी आरोग्यसेवा व्यावसायिकांची नवी पिढी विकसित करण्याच्या आमच्या मिशनला अनुरूप आहे. आमचे उद्दिष्ट आहे की, आम्ही आणि मेट्रोपॉलिस मिळून आरोग्यसेवा शिक्षणात नवी मानके निर्माण करू, डायग्नोस्टिक्स तसेच रुग्णांच्या देखभालीशी संबंधित नवनवीन मागण्या आत्मविश्वासाने पूर्ण करण्यासाठी पदवीधरांना सक्षम करू.”
या कोर्सेसविषयी अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा – डीवाय पाटील (डीम्ड टू बी) युनिव्हर्सिटी वेबसाईट –
dypatil.edu/programs/medical-fellowship-programs.