फोटो सौजन्य- iStock
जगभरातील सर्वात मोठ्या आणि जुन्या शैक्षणिक संस्था या युरोपामध्ये आहेत. या शैक्षणिक संस्थांना दर्जेदार शिक्षणाचा वारसा आहे. अशा संस्थांमध्ये शिक्षण घेण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मात्र परदेशातील शिक्षण महाग असल्याचा विचार करुन अनेक विद्यार्थी तो पर्याय स्वीकारत नाहीत. मात्र युरोपातील काही प्रमुख देशांचे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीभिमुख असून तेथे फ्री एज्युकेशन अथवा प्रचंड सवलत देण्यात येते. विशेष म्हणजे याचा लाभ भारतीय विद्यार्थीही घेत आहेत.
युरोपामधील काही देशांमधील शासनाच्या विद्यापीठामध्ये पूर्णपणे विनामुल्य शिक्षण दिले जाते तर काही विद्यापीठामध्ये नाममात्र शुल्क भरावे लागते. यामुळे परदेशातील उत्तम विद्यापिठाच्या शैक्षणिक शुल्काचा बोजा विद्यार्थ्यांवर पडत नाही. विद्यार्थी अतिशय दर्जेदार शिक्षण कोणत्याही आर्थिक समस्येशिवाय घेतो. जाणून घेऊया युरोपातील अशा देशांविषयी
जर्मनी
जर्मनी या देशात एकूण शैक्षणिक क्षेत्रालाच फार महत्व दिले जाते. जर्मनीमधील बहुतांश सरकारी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना विनामुल्य शिक्षण दिले जाते. महत्वाचे म्हणजे यामध्ये जर्मनीतील विद्यार्थांसोबतच इतर देशातील विद्यार्थ्यांनाही विनामूल्य शिक्षणाचा लाभ मिळतो. सध्या जर्मनीमध्ये १५ हजार भारतीय विद्यार्थी घेत आहेत. जर्मनीमधील अभियांत्रिक आणि तांत्रिक शिक्षण हे अव्वल दर्जाचे आहे.
नॉर्वे
नॉर्वेमध्ये फ्री एज्युकेशनचे धोरण असल्याने तेथील सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मोफत आहे. हे धोरण बॅचलर, मास्टर्स आणि पीएचडी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू आहे. विशेष म्हणजे या देशात नोकरीच्याही भरपूर संधी आहेत.
फिनलंड
फिनलंड देशातही पीएचडी प्रोग्रामसाठी अभ्यास करणे पूर्णपणे विनामूल्य आहे. फिनलॅंडमधील काही विद्यापीठे ही पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देखील देतात.
आइसलँड
आइसलॅंड या देशात सरकारी विद्यापिठांमध्ये ट्यूशन फी भरावी लागत नाही. प्रवेशाकरिता अल्प नोंदणी शुल्क भरावे लागते.
चेक रिपब्लिक
चेक रिपब्लिकमध्ये जर विद्यार्थी हा तेथील चेक भाषेत शिकत आहे तर त्या विद्यार्थ्यास फी भरावी लागत नाही. मग तो विद्यार्थी हा कोणत्याही देशाचा नागरिक असो. मात्र तेथे इंग्रजीमधून शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी शुल्क भरावे लागते.
परदेशातील शिक्षणासाठी इतर देशामध्येही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये विशेषकरुन भारतीय विद्यार्थी हे अमेरिका, कॅनडा, ब्रिटनचा पर्याय निवडताना दिसतात. गेल्या काही वर्षापासून ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्येही शिक्षणासाठी ज्याणाचा कल वाढताना दिसत आहे. या सर्व देशात शिक्षण घेण्यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये असणारे शुल्क हे फार जास्त असते. त्याकरिता भारतीय विद्यार्थी शैक्षणिक कर्ज काढताना दिसतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांना युरोपातील 5 देश हे उत्तम पर्याय ठरतील हे नक्की.