फोटो सौजन्य- सोशल मीडिया
एका प्रतिष्ठित संस्थेची पदवी आणि दोन दशकांपेक्षा जास्त अनुभव सामान्यतः मजबूत करिअरची ओळख मानली जाते. पण अमेरिकेत राहणाऱ्या गौतम देव यांची कहाणी हे दर्शवते की, बदलत्या जॉब मार्केटमध्ये अनुभव आणि पदवी असूनही परिस्थिती किती वेगाने बदलू शकते. आयआयटी कानपूरमधून (IIT Kanpur) शिक्षण घेतलेले आणि तंत्रज्ञान क्षेत्रात २० वर्षांहून अधिक अनुभव असलेले ६१ वर्षीय गौतम आज स्थायी नोकरीच्या शोधात आहेत.
गौतम यांच्या अडचणींची सुरुवात सप्टेंबर २०२४ मध्ये झाली. ते डॅलसमध्ये (Dallas) सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. कंपनीने त्यांना नोकरी चालू ठेवण्यासाठी दुसऱ्या राज्यात शिफ्ट होण्यास सांगितले. गौतम यांनी ठिकाण बदलण्याऐवजी डॅलसमध्येच राहून नवीन नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांना अशी अपेक्षा होती की, त्यांच्या जुन्या अनुभवाच्या आणि टेक्निकल बॅकग्राउंडच्या जोरावर काही महिन्यांतच त्यांना नवीन संधी मिळेल. पण ही अपेक्षा हळूहळू लांबलेल्या बेरोजगारीत बदलली.
नोकरीचा शोध ठरला लांबलेली परीक्षा गौतम यांनी त्यांच्या प्रोफेशनल नेटवर्कद्वारे नोकऱ्या शोधण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी संपर्क साधूनही त्यांना नोकरी मिळाली नाही. काही ठिकाणी भरती सुरूच नव्हती, तर अनेक कर्मचारी स्वतः आपल्या नोकऱ्यांबाबत असुरक्षित फिल करत होते. त्यांना मुलाखतीची संधी नक्कीच मिळाली आणि एका कंपनीत तर अनेक राऊंड्सपर्यंत चर्चाही झाली, पण शेवटी नोकरीची ऑफर मिळू शकली नाही.
AI शी संबंधित पदांची वाढती मागणी गौतम यांच्या मते, त्यांचे वय आणि बऱ्याच काळापासून नोकरीबाहेर असणे आता त्यांच्यासाठी मोठे आव्हान बनले आहे. टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीही वेगाने बदलत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सशी (AI) संबंधित पदांची वाढती मागणी पाहता, त्यांना असेही जाणवले की त्यांचा अनुभव प्रत्येक नवीन भूमिकेसाठी पुरेसा नाही. एआय इंजिनिअरिंगच्या अनेक जागा पाहूनही ते स्वतःला त्या पदांसाठी पूर्णपणे योग्य मानत नाहीत.
गिग वर्कचा आधार सतत अर्ज करूनही स्थायी नोकरी न मिळाल्यामुळे गौतम यांनी स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी इतर मार्ग शोधले. त्यांनी काही काळ डे ट्रेडिंगमधून कमाई करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला फायदा झाला, पण ही कमाई दीर्घकाळ टिकली नाही. यानंतर त्यांनी उबर, डोअरडॅश आणि वॉलमार्ट स्पार्क सारख्या प्लॅटफॉर्मवर गिग वर्क सुरू केले. मात्र, डिलिव्हरीतून मिळणारे उत्पन्न त्यांच्या खर्चाच्या तुलनेत अपुरे आहे. दुसरीकडे, प्रकृतीच्या कारणास्तव ते प्रत्येक प्रकारची डिलिव्हरी असाइनमेंट करू शकत नाहीत.
बचत संपली दीर्घकाळ बेरोजगार राहिल्याचा परिणाम आता त्यांच्या आर्थिक स्थितीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यांची बचत संपली असून रोजचे खर्च भागवण्यासाठी क्रेडिट कार्डचे कर्ज वाढले आहे. डॅलसचे भाडेही त्यांच्यासाठी मोठी चिंतेची बाब बनले आहे. त्यांना स्वस्त घर शोधायचे आहे, पण त्यांना भीती वाटते की नियमित नोकरी आणि उत्पन्नाशिवाय नवीन घर मिळणे कठीण होऊ शकते.






