फोटो सौजन्य - Social Media
काही व्यक्ती आपलं यश स्वतःच्या हाताने घडवतात, आकाश कुलहरि हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आज ते देशाचे वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. मात्र त्यांच्या यशामागे संघर्ष, अपयश आणि प्रचंड मेहनत दडलेली आहे. राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात जन्मलेले आणि वाढलेले आकाश शालेय जीवनात फारसे हुशार विद्यार्थी नव्हते. सन १९९६ मध्ये दहावीच्या परीक्षेत त्यांना केवळ ५७ टक्के गुण मिळाले. या अपयशामुळे त्यांच्या शाळेने त्यांना हकालपट्टी केली आणि पुन्हा प्रवेश नाकारला. त्या काळात हा धक्का खूप मोठा होता, पण त्यांनी हार मानली नाही.
आकाशचे वडील मात्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांनी मुलाला केंद्रीय विद्यालय, बीकानेर येथे प्रवेश मिळवून दिला. इथे आकाशने जिद्दीने अभ्यास केला आणि बारावीमध्ये तब्बल ८५% गुण मिळवत सर्वांना आश्चर्यचकित केले. या यशामुळे कुटुंबाचं समाधान आणि अभिमान दोन्ही वाढलं. पुढे त्यांनी २००१ मध्ये डूग्गल कॉलेज, बीकानेर येथून बी.कॉम पूर्ण केलं. त्यानंतर दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात प्रवेश घेऊन सामाजिक शास्त्र शाखेतून एम.कॉम पदवी मिळवली.
शैक्षणिक प्रवासासोबतच त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. २००५ मध्ये त्यांनी जेएनयू मधून एम.फिल पूर्ण केलं आणि त्यानंतर २००६ मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण करत IPS अधिकारी बनले. ही त्यांची मेहनत, आत्मविश्वास आणि चिकाटीची खरी फळं होती.
आज आकाश कुलहरि यांनी कानपूरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त, फायर सर्व्हिसचे डीआयजी तसेच प्रयागराज येथे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशा जबाबदारीच्या पदांवर कार्य केले आहे. त्यांच्या प्रवासातून विद्यार्थ्यांना एक मोठा धडा मिळतो – अपयश म्हणजे अंत नाही, तर नव्या सुरुवातीचा मार्ग असतो. शाळेतून काढून टाकलेला मुलगा देशाची सेवा करणारा IPS अधिकारी बनू शकतो, हे सिद्ध करणारा प्रेरणादायी प्रवास म्हणजे आकाश कुलहरि यांची कहाणी.