Chandrakant Patil Decision: शासनाचा अनोखा उपक्रम! एकल मातांच्या पाल्यांना उच्च शिक्षणात मिळणार....

Chandrakant Patil Decision: एकल मातांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी राज्यातील १,२३८ अनुदानित महाविद्यालयांत समुपदेशक नेमले आहेत. २७ नोव्हेंबरपासून एमएसएफडीसीमार्फत प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे.
career
फोटो सौजन्य - एआय career
Published on: 
Updated on: 
  • एकल मातांच्या पाल्यांना उच्च शिक्षणात मिळणार समुपदेशनाचा आधार

  • राज्यातील १,२३८ समुपदेशकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात

  • प्रत्येक अनुदानित महाविद्यालयात एक समुपदेशक

Chandrakant Patil Decision: एकल मातांच्या पाल्यांचे शिक्षण कोणत्याही अडचणीमुळे थांबू नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील १ हजार २३८ अनुदानित महाविद्यालयांमध्ये समुपदेशक नेमण्यात आले असून, महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमीच्या (एमएसएफडीसी) माध्यमातून या समुपदेशकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होत आहे, अशी माहिती एमएसएफडीसीचे कार्यकारी संचालक आणि उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविला जात आहे. एकल मातांच्या पाल्यांना शिक्षण घेताना अनेकदा आर्थिक, सामाजिक आणि भावनिक अडचणी येतात.

त्यांना उच्च शिक्षणात कोणत्या सुविधा देता येतील आणि कोणत्या कल्याणकारी योजना राबवता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी विभागाने डॉ. हेमलता बागला यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या एकल पाल्यांची नेमकी संख्या ठरवण्यासाठी सर्वेक्षणही सुरू आहे.

या उपक्रमात प्रत्येक अनुदानित महाविद्यालयात एका समुपदेशकाची नेमणूक झाली आहे. हे समुपदेशक एकल पाल्यांना मार्गदर्शन करतील, त्यांच्या अडचणी समजून घेतील आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांवर लक्ष ठेवतील.

प्रशिक्षण किती टप्प्यात होणार?

प्रशिक्षण दोन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात प्रत्येक सार्वजनिक विद्यापीठातून तीन मास्टर ट्रेनर्स निवडले जात आहेत. यात सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि संचालक, विद्यार्थी कल्याण यांचा समावेश आहे. मास्टर ट्रेनर्सच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी एमएसएफडीसी येथे होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे मास्टर ट्रेनर्स विद्यापीठ स्तरावर सर्व १,२३८ समुपदेशकांचे प्रशिक्षण पूर्ण करतील.

चंद्रकांत पाटील मंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची भूमिका

“एकल मातांच्या पाल्यांचे शिक्षण कोणत्याही अडचणीमुळे थांबू नये, ही शासनाची भूमिका आहे. प्रत्येक महाविद्यालयातील समुपदेशक या विद्यार्थ्यांसाठी हक्काचा आधार ठरतील. बागला समितीच्या शिफारसी आणि सर्वेक्षणातून मिळणारी आकडेवारी यांच्या आधारे या विद्यार्थ्यांसाठी ठोस योजना आखल्या जातील.”

राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर काय म्हणाले?

“राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण संस्थांमध्ये एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांची (एकल पाल्यांची) संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण पूर्ण होऊन एकल पाल्यांची नेमकी संख्या समोर आल्यानंतर त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवता याव्यात, यासाठी राज्यातील सुमारे १,२३८ महाविद्यालयांमध्ये समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे.

एकल पाल्यांसाठी कोणत्या स्वरूपाच्या योजना राबवता येतील, याचे योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून या समुपदेशकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार एमएसएफडीएच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विद्यापीठ स्तरावर इतर समुपदेशकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल.”

Q

एकल मातांच्या पाल्यांसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने कोणता उपक्रम सुरू केला आहे?

A

एकल मातांच्या पाल्यांचे उच्च शिक्षण कोणत्याही आर्थिक, सामाजिक किंवा भावनिक अडचणींमुळे थांबू नये, यासाठी राज्यातील १,२३८ अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी एका समुपदेशकाची नेमणूक करण्यात आली आहे.

Q

या समुपदेशकांचे प्रशिक्षण कोणामार्फत आणि कसे घेतले जाणार आहे?

A

महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमीच्या (MSFDC) माध्यमातून दोन टप्प्यांत हे प्रशिक्षण होणार आहे. पहिल्या टप्प्यात शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रत्येक सार्वजनिक विद्यापीठातून निवडलेल्या तीन 'मास्टर ट्रेनर्स'ना प्रशिक्षण दिले जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात हे मास्टर ट्रेनर्स विद्यापीठ स्तरावर सर्व १,२३८ समुपदेशकांना प्रशिक्षित करतील.

Q

या उपक्रमात नेमलेले समुपदेशक विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करतील?

A

प्रत्येक महाविद्यालयातील समुपदेशक एकल पाल्यांना शैक्षणिक व भावनिक मार्गदर्शन करतील, त्यांच्या अडचणी समजून घेतील आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध कल्याणकारी सुविधांवर लक्ष ठेवतील.