फोटो सौजन्य - Social Media
शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रत्येक वर्गात २-४ विद्यार्थी असे असतात जे नेहमी टॉपर ठरतात आणि शिक्षकांचे आवडतेही असतात. त्यांची अभ्यासपद्धती, शिस्त आणि विचार करण्याची पद्धत इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी असते. जर तुम्हालाही आपल्या क्लासमध्ये टॉप करून अभिमान वाटावा असं वाटत असेल, तर हे पाच महत्त्वाचे गुण नक्की आत्मसात करा.
सर्वप्रथम, शिस्तबद्ध जीवनशैली ही टॉपर विद्यार्थ्यांची खासियत असते. ते अभ्यास, खेळ, जेवण, झोप या सर्व गोष्टी ठरलेल्या वेळेत पूर्ण करतात. वेळेचं नियोजन नीट करणं हीच यशाची पहिली पायरी मानली जाते. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे नियमित अभ्यासाची सवय. टॉपर विद्यार्थी एका दिवसात खूप तास अभ्यास करण्याऐवजी दररोज ठराविक वेळ अभ्यासाला देतात. त्यामुळे परीक्षेच्या वेळी अचानक अभ्यासाचा ताण जाणवत नाही आणि मन एकाग्र राहतं.
तिसरा गुण म्हणजे सेल्फ मोटिव्हेशन. प्रत्येक टॉपरकडे स्वतःला पुढे नेण्याची प्रेरणा असते. हीच प्रेरणा त्यांना लक्ष्य गाठण्यासाठी आणि सतत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करते. चौथा गुण म्हणजे सक्रिय सहभाग. टॉपर विद्यार्थी कधीही शिक्षकांना प्रश्न विचारायला, संवाद साधायला किंवा शंका मांडायला कचरतात नाहीत. ते वर्गात नेहमी सक्रिय असतात आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये मनापासून भाग घेतात.
पाचवा आणि शेवटचा गुण म्हणजे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व. टॉपर विद्यार्थी फक्त अभ्यासापुरते मर्यादित राहत नाहीत, तर खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा अशा प्रत्येक क्षेत्रात आपली कला आणि कौशल्य दाखवतात. त्यामुळे ते सहविद्यार्थी आणि शिक्षकांच्या कायम पसंतीस उतरतात. थोडक्यात सांगायचं झालं तर, वेळेचं योग्य नियोजन, नियमित अभ्यास, स्वतःला प्रेरणा देण्याची वृत्ती, वर्गात सक्रिय सहभाग आणि सर्वांगीण विकास ही टॉपर विद्यार्थ्यांची खरी ओळख आहे. हे गुण आत्मसात केले तर कोणताही विद्यार्थी आपल्या वर्गात टॉपर ठरू शकतो.