फोटो सौजन्य - Social Media
युनियन बँक ऑफ इंडियाने 2025-26 या भरती प्रकल्पांतर्गत 500 असिस्टंट मॅनेजर पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) कॅडरअंतर्गत केली जाणार असून, क्रेडिट आणि आयटी या दोन विभागांमध्ये प्रत्येकी 250 पदे भरण्यात येणार आहेत. देशभर कार्यरत असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँकेत नोकरी करण्याची ही एक चांगली संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 एप्रिल 2025 पासून 20 मे 2025 या कालावधीत अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
क्रेडिट विभागातील असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी आणि सोबत CA, CMA किंवा CS पदवी असावी, किंवा MBA/PGDM (Finance) मध्ये किमान 60% गुण (SC/ST/OBC/PwBD साठी 55%) असलेले असावे. IT विभागासाठी B.E., B.Tech, M.Sc., M.Tech किंवा MCA ही पदवी संगणक/IT/Data/Cyber Security संबंधित शाखेतून घेतलेली असावी आणि संबंधित क्षेत्रातील किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2025 रोजी 22 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयात सवलत मिळेल – SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे, PwBD साठी 10 वर्षे आणि माजी सैनिक व 1984 च्या दंगलीतील पीडितांना 5 वर्षे सवलत आहे.
SC, ST आणि PwBD (Persons with Benchmark Disabilities) प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी केवळ ₹177 (GST सहित) ठेवण्यात आली आहे, तर उर्वरित सर्व श्रेणींतील उमेदवारांसाठी ही फी ₹1180 इतकी आकारण्यात येणार आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी आपला प्रवर्ग नीट तपासून योग्य फी भरावी. निवड प्रक्रिया ही बँकेच्या धोरणानुसार तीन टप्प्यांमध्ये पार पडेल — सर्वप्रथम ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल, त्यानंतर आवश्यकतेनुसार ग्रुप डिस्कशन (चर्चासत्र) होऊ शकते आणि शेवटी पात्र उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. अर्जदारांची संख्या, पात्रता आणि इतर घटक लक्षात घेऊन बँक ही निवड प्रक्रिया किती टप्प्यांत आणि कोणत्या स्वरूपात राबवायची, हे अंतिमतः ठरवेल. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अद्ययावत माहिती तपासणे आवश्यक आहे.
ही भरती देशभरातील शाखांसाठी आहे. यामध्ये स्थिर करिअर, प्रोमोशन संधी आणि उत्तम वेतन मिळू शकते. बँकिंग किंवा IT क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्यासाठी unionbankofindia.co.in या वेबसाइटला भेट द्या.