मावळमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; कोयता अन् लोखंडी रॉडने बेदम मारहाण
वडगाव मावळ : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता मावळ तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्यातील सांगवी येथील प्रेमविवाहातून झालेल्या हल्ला प्रकरणातील तिन्ही आरोपींना सोमवारी अखेर अटक केली आहे. वडगाव मावळ पोलिसांनी ही कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी याबाबत माहिती दिली.
सांगवी गावच्या हद्दीत अनुष्का हॉटेलजवळ ही धक्कादायक घटना ५ एप्रिलला रात्री ८ वाजता घडली होती. प्रेमविवाह केलेल्या युवकावर त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांनीच प्राणघातक हल्ला केला होता. संकेत मारुती तोडकर (२९, रा. तोडकर आळी, सांगवी) हे आपल्या चुलत भावासह स्कुटीवर बसून गावातील यात्रेच्या वर्गणीचा हिशोब करत असताना, शिवराज बंडू जाधव या आरोपीने आपल्या बहिणीशी झालेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून इतर दोन आरोपी यश अजय जाधव (२२) आणि विशाल पाथरवट यांच्या मदतीने स्कुटीला मोटारसायकलने धडक दिली.
दरम्यान त्यानंतर तिघांनी मिळून कोयता, लोखंडी रॉडने संकेत तोडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात संकेत यांच्या उजव्या हाताचा दंड, खांदा आणि डोक्यावर गंभीर मारहाण करण्यात आली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कात्रज भागात दोघांवर टोळक्याचा हल्ला
वैमनस्यातून टोळक्याने दोन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश खंडू कांबळे (वय २३, रा. ग्रीन हिल पार्क सोसायटी, जैन मंदिराजवळ, कात्रज), सार्थक उर्फ ओम नितीन पंडीत (रा. अटल चाळ, कात्रज) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ओंकार सुनील ढेबे, अनुज शिवराज लोखंडे, अमन जाफर शेख, रामेश्वर जाधव, आदित्य जालिंदर शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यश कांबळे याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.