संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. अशातच आता शिरुरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर दगडफेक व हाणामारीत झाल्याची घटना सोमवारी (दि. १३) रात्री घडली आहे. या प्रकरणी सुमारे ५० जणांच्या टोळक्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री काही नागरिक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी पोलीस अंमलदार उमेश भगत हे हरिष राजपूत यांची तक्रार नोंदवत असताना पोलीस ठाण्याबाहेर ४० ते ५० जणांचा जमाव जमला. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होऊन शिवीगाळ झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस हवालदार उमेश भगत, सतीश मुंडे, बंडू कोठे, शंकर चव्हाण तसेच महिला पोलीस अंमलदार परवीन पप्पूवाले, भाग्यश्री सुपेकर, चैताली सपकाळ यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने पोलिसांचे न ऐकता एकमेकांवर मारहाण करत दगडफेक सुरू केली.
दगडफेकीत काही जण जखमी
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दगडफेकीत काही जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार सतीश नाथराव मुंडे (वय ३८, रा. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरिष राजपूत, राजू शेवाळे, गणेश भोसले, विनोद जाधव, तरबेज बोरगे, हबीब सय्यद, सलमान शेख, हफिज शेख, कलीम सय्यद, कायम सय्यद, तेजस जाधव यांच्यासह सुमारे ४० अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत.
हे सुद्धा वाचा : शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली महागात; तब्बल लाखो रुपयांना तरुणाला घातला गंडा
जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला
निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (११ एप्रिल) रोजी पहाटे ४:५० च्या सुमारास ही घटना घडली आहे. विवेक ऊर्फ विकी विनोद सोनकांबळे (वय १९, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी), जुबेर नासीर शेख (वय ३०), श्रवण ऊर्फ सुरज शाहजी कुऱ्हाडे (वय २० दोघेही रा. पीसीएमसी वसाहत, निगडी) आणि त्यांच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विवेक सोनकांबळे आणि जुबेर शेख या दोघांना अटक केली आहे. प्रसाद नंदकुमार बहुले (३०, अण्णाभाऊ साठे नगर, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.






