संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती वाढत आहे. अशातच आता पुण्यातून आणखी एक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाची १७ लाख २३ रूपयांची फसवणूक केली आहे.
ही घटना २ डिसेंबर ते २६ जानेवारी २०२६ कालावधीत खराडीत घडली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय तरूणाने खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण खराडीत राहायला असून, २ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअॅपद्वारे लिंक पाठवली. ग्रुपमध्ये अॅड करून घेत त्यांना अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याद्वारे नफा दर्शवून सायबर चोरट्यांनी संबंधित तरूणाला गुंतवणूक करण्यास सांगितले. तब्बल १७ लाख २३ हजार रूपयांची गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने तरुणाची फसवणूक
पुण्यातून एक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाची २ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइलवर संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला एक काम ऑनलाइन पद्धतीने करण्यास दिले. या कामाचे पैसे तरुणाच्या खात्यात जमा केल्याचे चोरट्यांनी सांगितले. प्रत्यक्षात चोरट्यांनी तरुणाच्या खात्यात पैसे जमा केले नव्हते. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून चोरट्यांनी तरुणाला पैस गुंतविण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी दोन लाख ७१ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.






