

संभाजीनगरमध्ये काल्डा कॉर्नर परिसरातून तरुणाचे अपहरण
जालन्यातील टोळीने जयेशला जबरदस्तीने गाडीत बसवले
उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारातून पुण्याहून छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एका तरुणाचे काल्डा कॉर्नर परिसरातून अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. काळ्या स्कॉर्पिओतून आलेली जालन्यातील टोळी तरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवून पसार झाली. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
अक्षय वाघ (रा. जालना) आणि त्याच्या अन्य साथीदाराविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात राजेश सुभाषचंद बाफना (वय ५६, रा. आम्ला अपार्टमेंट, व्यंकटेश नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांचा मुलगा जयेश बाफना हा २३ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कारने (क्र. एमएच १२-डब्ल्यूजे ६४०१) पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे निघाला होता. त्याच्यासोबत योगेश मुंडे, अक्षय मुंडे आणि चालक गणेश परशुराम जाधव होते. मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास त्यांची गाडी काल्डा कॉर्नर परिसरात पोहोचली. तेथे एका इनोव्हा गाडीत दोघे बसलेले होते. जयेश त्यांच्यासोबत बोलत असतानाच काळ्या रंगाची स्कॉर्पिओ तेथे आली. या स्कॉर्पिओमध्ये तीन ते चार जण होते. त्यातील दोघे खाली उतरले आणि त्यांनी जयेशला गाडीत बसून बोलण्यास सांगितले. यावेळी त्यांच्यापैकी एकाने जयेशसोबत पुण्याहून आलेल्या चालकांना, तुम्ही आता निघून जा, आमच्यात पैशाचा व्यवहार आहे, असे सांगितले.
जयेशचाही मोबाइल होता बंद; संपर्क तुटला
घटनेनंतर पोलिसांनी जयेशच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा मोबाइल बंद येत होता. काही वेळाने योगेश मुंडे यांच्या मोबाइलवर जयेशच्या क्रमांकावरून फोन आला. आपण मित्र अक्षय वाघसोबत पुण्याला परत जात असून पैशांचा व्यवहार पुण्यात जाऊन आपसात मिटवणार असल्याचे जयेशने सांगितल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी अक्षय वाघ याच्याशी संपर्क साधून त्याला जयेशला घेऊन जाणाऱ्या वाहनाचा क्रमांक विचारला. त्यावेळी गाडी थांबवून वाहनाचा क्रमांक आणि फोटो पाठवतो, असे त्याने सांगितले. मात्र, त्याने वाहनाचा क्रमांक किंवा फोटो पाठवला नाही. त्यानंतर अक्षय वाघचा मोबाइल बंद झाला. जयेशचाही मोबाइल बंद असल्याने दोघांशी संपर्क होऊ शकला नाही.
जयेश बाफना याचे अपहरण कुठे झाले?
छत्रपती संभाजीनगर शहरातील काल्डा कॉर्नर परिसरात २४ नोव्हेंबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास अपहरणाची घटना घडली.
जयेश बाफना याच्या अपहरणामागचे कारण काय आहे?
प्राथमिक माहितीनुसार, पैशांच्या देवाण-घेवाणीच्या व्यवहारातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
या प्रकरणात कोणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?
अक्षय वाघ (रा. जालना) आणि त्याच्या अन्य साथीदाराविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.